सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना- वनविभागाकडून रात्रभर कसून शोध
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर व परिसरात गर्द झाडी असल्याने व अजिंक्यतारा किल्ला परिसरानजिक असलेल्या रहिवाशी वस्तीत, उपनगरात बिबटय़ाचा वावर तसा सातारकरांसाठी कॉमन आहे. सोमवारी रात्री बिबटय़ा चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकाला दिसल्याने मोठी खळबळ उडाली. जिल्हाधिकारी शेखर सिहांच्या कार्यालयात दर्शन देवून गेलेल्या बिबटय़ाची शोध मोहीम रात्रभर सुरु होती. त्यात पावसाने अडथळा आणला तोपर्यंत बिबटय़ा तेथून पसार झाला होता.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभाग बंद करुन अधिकाऱयांसह कर्मचारीही निघून गेले. सायंकाळी 7 च्या सुमारास महामुनी नावाचे कर्मचारीही घरी जाण्यासाठी निघाले असताना त्यांना चक्क बिबटय़ाचे दर्शन झाल्याने त्यांची घाबरुन बोबळीच वळाली. या धक्क्यातून सावरल्यावर त्यांनी कार्यालयाच्या परिसरात बिबटय़ा दिसल्याची घटना रात्रपाळीच्या वॉचमन, शिपायांना सांगितली.
वॉचमनने ही घटना वनविभागाला कळवल्यानंतर रात्री 9.30 च्या सुमारास वनविभागाने तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बिबटय़ाला पकडण्याच्या साहित्यासह धाव घेतली. तोपर्यंत मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे त्या अगोदरच उपस्थित राहिले होते. त्यांनी बिबटय़ाच्या पंजाचे ठसे मिळतात का हे पाहणे सुरु केले होते. मात्र, रात्री पावसाने देखील जोर धरल्याने बिबटय़ाचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या.
वनविभागाचे अधिकारी चव्हाण, सुहास भोसले यांच्यासह 15 ते 20 कर्मचाऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर पिंजून काढला. मात्र, बिबटय़ा आढळून आला नाही. मात्र, त्याच्या 3 इंच लांबीचे पंजाचे ठसे आढळून आल्याने गांभीर्य वाढले होते. रात्रीची वेळ, रिमझिम पावसात रात्री 12 वाजेपर्यंत वनविभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बिबटय़ाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबटय़ा आढळून आला नाही.
मंगळवारी सकाळी वनविभागाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कॅमेरे सेट केलेले आहेत. जर बिबटय़ाचा पुन्हा वावर झाल्यास तो कॅमेऱयात कैद होईल असे सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात बिबटय़ाचे दर्शन झाल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर अनेकजण सिंहांच्या कार्यालयात बिबटय़ा असे या वर्णन शेखर सिंह यांच्या नावातील सिंह या शब्दामुळे करत होते.
भटक्या कुत्र्यांमुळे बिबटय़ाचा वावर वाढला
सातारा शहर व परिसरात उघडय़ावर टाकण्यात येणारे टाकाऊ पदार्थ, मांस, हॉटेल्स, खाद्य पदार्थांच्या गाडय़ावरील वेस्टेज यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. बिबटय़ा कुत्र्यांची शिकार करण्यासाठी शहर परिसरात अनेक वेळा आलेला असून सोमवारी रात्री देखील बिबटय़ा कुत्र्यांचा माग काढत भरकटला असावा व त्यामुळे तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दाट झाडीत घुसला असावा, असा कयास मानद वन्यजीव रक्षक व निसर्ग अभ्यासक सुनील भोईटे यांनी वर्तवला.
गर्द झाडीत बिबटय़ा तर नाही ?
जिल्हाधिकारी कार्यालय मंगळवारी नेहमीप्रमाणे सुरु झाले. मात्र, परिसरात रात्री बिबटय़ा येवून गेल्याची चर्चा रंगली होती. तर अनेकांचे लक्ष कार्यालय परिसरातील दाट झाडीकडे जात होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाट झाडी असल्याने कदाचित बिबटय़ा अद्याप त्यात दडून तर बसला नाही ना? अशीच भावना दाटून राहिली होती. मात्र, बिबटय़ा रात्रीच निघून गेला असावा व तो त्याच्या नैसर्गिक निवासाकडे रवानाही झाला असल्याने त्याचे पुन्हा दर्शन झाले नाही.
श्वानपथक वायसी कॉलेज जवळ घुटमळले
मंगळवारी सकाळी सहा वाजता वन विभागाचे पथक विशेष श्वानपथकासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दाखल झाले. श्वान पथक वायसी कॉलेज जवळ घुटमळले. काल रात्री करण्यात आलेल्या शोधमोहिमेत बिबटय़ाचे अस्तित्त्व कोठेही आढळून आली नसल्याची माहिती सातारा तालुक्याचे वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांनी दिली. बिबटय़ाच्या पाऊलखुणा कोठेही आढळून आल्या नसल्यातरी खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी सकाळी वनविभागाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कॅमेरे सेट केलेले आहेत. जर बिबटय़ाचा पुन्हा वावर झाल्यास तो कॅमेयात कैद होईल असे सांगण्यात आले.








