प्रतिनिधी/ सातारा
शेतीत कोणतेही पीक घेतले तरी त्याला रास्त भाव मिळत नसल्यामुळे शेती तोटय़ात करावी लागत आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. शेतीच्या मशागतीसाठी केलेला खर्चही मिळत नाही. शेतीला रस्ता नसल्यामुळे व गांजाला चांगला भाव असल्यामुळे गांजा लागवड करण्यासाठी 1 सप्टेंबर पर्यंत परवानगी द्यावी, अशी मागणी तारगाव, ता. कोरेगाव येथील शेतकरी सुनील संपत मोरे यांनी केली आहे.
मोरे यांनी जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तारगाव, ता. कोरेगाव येथे स्वतःच्या मालकीची जमीन गट नं. 1272 मध्ये माझ्या स्वतःच्या मालकीची एक एकर शेती आहे. मी कोणतेही पीक घेतले तरी त्याला रास्त भाव मिळत नसल्यामुळे शेती तोटय़ात करावी लागत आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे.
शेतीच्या मशागतीसाठी केलेला खर्चही मिळत नाही. शेतीला रस्ता नसल्यामुळे व गांजाला चांगला भाव असल्यामुळे गांजा लागवड करण्यासाठी 1 सप्टेंबर पर्यंत परवानगी द्यावी. प्रशासनाकडून परवानगी मिळेल असे गृहीत धरून मी गांजाची लागवड करीत आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री आणि तहसीलदार यांनाही देण्यात आल्या आहेत.








