प्रतिनिधी / फोंडा
गोव्यातील कोरोनाबाधित रूग्णांना ऑक्सिजनचा जबर तुटवडा भासत असताना गोव्यातून ऑक्सिजनचा पुरवठा सिंधुदुर्गात होत असल्याची बाब गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करीत उघड केली होती. त्याची दखल घेत काल रविवारी सायंकाळी पणजी पोलीसांनी चौकशी करताना तब्बल चार तास फोंडा पोलीस स्थानकात दुर्गादास कामत यांची उलटतपासणी केली.
दुर्गादास कामत यांनी 6 मे रोजी आपल्या ट्व्टिर अकाऊंटवरून पत्रादेवी चेकनाक्यामार्गे सावंतवाडीच्या दिशेने ऑक्सिजन सिलींडरने भरलेले वाहन टिपत कॅप्शन स्टोरी प्रसारीत केली होती. त्यानंतर दुसऱया दिवशी सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी वेर्णा गोवा येथून ऑक्सिजनचा पुरवठा केल्याने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानल्याची खळबजनक बातमी टिव्हीवर प्रसारण केली होती. या अनुषंगाने दुर्गादास कामत यांनी आवाज उठविल्याबद्दल पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नाईक यांच्यासह उपअधिक्षक अडविन कुलासो यांनी फोंडा पोलीस स्थानकात तब्बल चार तास चौकशी व उलटतपासणी करून कामत यांची जबानी नोंद करून घेतली. मात्र त्यानंतर पणजी पोलिसांनी कोणतीच माहिती दिलेली नाही. दुर्गादास कामत यांनी आपण जी माहिती ट्व्टिरवर प्रसारीत केलेली आहे त्यावर ठाम असून त्यासंबंधी वाहनांचे फोटो, वाहनाचा नंबर तसेच टीव्हीवर प्रसारीत झालेली सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांचा व्हीडीओची जोडणी केलेली आहे. सरकारने याप्रकरणी गुंतलेल्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आपण आपल्या बोलण्यावर ठाम असून गोव्याच्या जनतेसाठी कोणत्य़ाही कारवाईला सामोरा जाण्यास डगमगत नसल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. कोरोनाकाळात राज्यात ऑक्सिजनअभावी जनता आक्रोश करीत आहेत. कोरोना हाताळणीत सरकार सपशेल अपयशी ठरला असून जनतेसाठी आवाज उठविणाऱयाचा आवाज दाबण्याचा प्रकार सरकार पोलिसाकरवी उलटतपासणी व चौकशीचा ससेमिरा लावून करीत असल्याचा आरोप दुर्गादास कामत यांनी केला आहे.









