वाहनधारक-नागरिकांना सावधानता बाळगण्याची गरज : 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचे काम हाती

प्रतिनिधी /बेळगाव
विद्युत वाहिन्या घालण्यासाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली. तसेच डेनेज वाहिन्यांसाठी व गॅस वाहिन्यांसाठी विविध रस्त्यांची खोदाई झाली. त्यानंतर रस्त्याचे काँक्रिटीकरण करून रस्ते सुस्थितीत करण्यात येत असतानाच आता 24 तास पाणी योजनेंतर्गत मुख्य रस्त्याशेजारी जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा खोदाईसत्र सुरू झाले असून, वाहनधारक आणि नागरिकांना सावधानता बाळगण्याची गरज आहे.
संपूर्ण शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर कामाची जबाबदारी एल. ऍण्ड टी. कंपनीकडे सोपविण्यात आली असुन, विविध ठिकाणी जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम करण्यात आले होते. त्यानंतर आता मुख्य जलवाहिन्या घालण्याचे काम विविध भागात सुरू झाले आहे. वडगाव, जुनेबेळगाव अशा विविध भागात मुख्य जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे धारवाड रोडशेजारी देखील जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काही रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले होते. तसेच रस्त्याशेजारी पेव्हर्स घालून संपूर्ण रस्ता सुसज्ज करण्यात आला आहे. पण आता जलवाहिन्या घालण्यासाठी या रस्त्यांची पुन्हा खोदाई सुरू झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेचे काम सुरू करण्यापूर्वी हेस्कॉमकडून भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्यात आल्या. तसेच काही भागात डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली. त्यानंतर गॅसवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली. ही कामे करत असतानाच स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध कामे सुरू करण्यात आली.
त्यामुळे अनेक रस्ते सातत्याने बंद होते. ही कामे पूर्ण करून रस्त्यांची दुरूस्ती अंतिम टप्प्यात आली असतानाच आता 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. याकरिता खोदाईसत्र सुरू झाले आहे. जलवाहिनी घालण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा काँक्रिटीकरण करण्यात आले नाही. केवळ पेव्हर्स घालून रस्ते करण्यात आले होते. सदर पेव्हर्स काढून आता जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा रस्त्यांची दुरवस्था होत आहे. ज्या ठिकाणी जलवाहिन्या घालण्यात येत आहेत त्या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करणे गरजेचे आहे. पण दुरूस्तीस विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रस्त्याची दुरूस्ती तातडीने करण्यात आल्यास शहरवासीय तसेच वाहनधारकांना कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. त्यादृष्टीने पाणीपुरवठा विभागाने आणि महापालिकेने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे.









