शहापूर विभाग म. ए. समितीच्या बैठकीत ठराव
प्रतिनिधी /बेळगाव
25 ऑक्टोबर रोजी महामोर्चा काढून मराठी भाषिक आपले न्यायहक्क मागणार आहेत. तसेच 1 नोव्हेंबर रोजी होणाऱया काळय़ा दिनातून केंद्र सरकार विरोधातील आपली नाराजी व्यक्त केली जाणार आहे. त्यामुळे महामोर्चा व काळा दिन यशस्वी करण्याचा ठराव शहापूर विभाग म. ए. समितीच्या बैठकीत शनिवारी करण्यात
आला.
गोवावेस रामलिंगवाडी, शहापूर येथील सिद्धीविनायक मंदिरात विभाग समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी हावळाण्णाचे होते.
युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, जिल्हा प्रशासनावर आपला दबदबा निर्माण करण्यासाठी आंदोलनाचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी हावळाण्णाचे यांनी शहर म. ए. समितीची पुनर्रचना करून युवा चेहऱयांना संधी द्यावी, त्याचप्रमाणे शहापूर विभागातून नावे पाठविली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
म. ए. समितीच्या नूतन नगरसेवकांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच मराठीद्वेष्टय़ा मनपा अधिकारी लक्ष्मी निपाणीकर यांचा निषेध ठराव मंजूर करण्यात आला.
यावेळी राजकुमार बोकडे, अभिजित मजुकर, गजानन शहापूरकर, सागर पाटील, सुनील बोकडे, मनोहर शहापूरकर, शिवाजी मजुकर, प्रभाकर पाटील, नारायण काकतकर, उमेश भातकांडे, दीपक तुळसकर, संदेश मधुरकर, अतुल पारिश्वाडकर, राजू नेसरीकर यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









