काही जणांना अटक : इतरांच्या सुटकेचा आरोप
प्रतिनिधी / बेळगाव
जमिनीच्या वादातून सावगाव येथे एकाचा खून करण्यात आला. या घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणानंतर काही जणांनाच अटक करण्यात आली आहे तर इतरांच्यावर अजूनही कारवाई करण्यात आली नसून या खून खटल्यात सामील असलेल्या सर्वांनाच अटक करावी आणि न्याय द्यावा, अशी मागणी सावगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सावगाव येथे दि. 21 मे रोजी रात्री रविंद्र नारायण कर्लेकर, किरण नारायण कर्लेकर, नारायण कर्लेकर, दत्ता नारायण कर्लेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये रविंद्र नारायण कर्लेकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. संशयित आरोपी जयवंत गुंडोजी देसूरकर, समीर सुरेश देसूरकर, रघु अर्जुन देसूरकर, सुरेश गुंडोजी देसूरकर, अर्जुन गुंडोजी देसूरकर (सर्व रा. बेनकनहळ्ळी) यांनी हा हल्ला केला. याचबरोबर इतर 25 ते 30 जण होते. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
न्यायालयात खटला सुरू असताना अशा प्रकारे हल्ला करून दहशत माजविण्यात आली आहे. तेव्हा त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.









