प्रतिनिधी / बेळगाव
‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या थैमानानंतर दुरुस्तीच्या कामासाठी गोवा येथे गेलेल्या हेस्कॉमच्या कर्मचाऱयांकडून कौतुकास्पद काम केले जात आहे. जोरदार पावसामध्येही वीजवाहिन्या घालणे, नवीन खांब बसविणे, ट्रान्स्फॉर्मर बदलणे असे काम केले जात आहे. गोवा विद्युत मंडळाच्या खांद्याला खांदा लावून हे कर्मचारी काम करत असल्याने दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आठवडा उलटला तरी अद्याप वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. गोव्यात जंगल प्रदेश अधिक असल्याने दुरुस्तीचे काम करताना अनेक अडचणी येत आहेत. गुरुवारी हेस्कॉमचे 20 कर्मचारी व 2 ज्युनिअर इंजिनिअर गोव्यात दाखल झाले. तेव्हापासून ते दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करीत आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने दुर्गम प्रदेशातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे रात्रंदिवस दुरुस्ती करण्यात येत आहे.









