वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी तालुक्यात बुधवारी कोरोनाचे 17 रुग्ण आढळले आहेत. शहरात सहा तर ग्रामीण भागात 11 रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत 59 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. 300 जणांवर उपचार सुरू आहेत. सावंतवाडी येथील समर्पित कोविड सेंटरमध्ये 20 बेड पूर्ण झाले आहे.
सावंतवाडी येथील भोसले कॉलेज येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. परंतु, अद्याप राणी जानकीबाई सुतिकागृह रुग्णालय पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ कोविड सेंटरसाठी ताब्यात घ्या, अशा सूचना करूनही अजुनही हे रुग्णालय ताब्यात देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. जर रुग्ण वाढल्यास करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सावतंवाडीत बुधवारी सकाळी रॅपिड टेस्ट करण्यात आली नाही. टेस्टचे कीटही उपलब्ध नव्हते. सायंकाळी नऊ जणांची तपासणी करण्यात आली. या सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली. मास्क न वापरणाऱया पाच जणांवर व वाहतुकीचे नियम तोडणाऱया 12 जणांवर कारवाई करण्यात आली, असे वाहतूक पोलीस प्रवीण सापळे यांनी सागितले. केसरी येथील एका 55 वर्षीय व्यक्तीला खासगी रुग्णालयात दाखल करून त्याची रॅपिड टेस्ट केली असता पॉझिटिव्ह आली. मात्र, कोल्हापूर येथे केलेली टेस्ट निगेटिव्ह आली, असे नातेवाईकांनी सांगितले. सावतवाडी शहरात बुधवारी सायंकाळपर्यंत सहा रुग्ण सापडले. त्यात खासगी रुग्णालयातील एक नर्स व कर्मचारी पॉझिटिव्ह सापडली.









