दोन वर्षांपूर्वी भावाचा झाला होता मृत्यू
सावंतवाडी:
कोलगाव-नाईकबाग येथील 25 वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मंगळवारी रात्री उपचारादरम्यान सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. रामचंद्र ऊर्फ मयुर रवींद्र चौगुले असे त्याचे नाव आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन वर्षापूर्वी रामचंद्र याच्या लहान भावाचा अलिबाग येथे पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. दोन्ही मुलांच्या मृत्यूमुळे चौगुले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कोलगाव-नाईकबाग येथील रामचंद्र चौगुले हा आपल्या आई-वडिलांसमवेत राहतो. त्यांची घरची परिस्थिती बेताची आहे. रामचंद्रच्या लहान मुलाचा दोन वर्षांपूर्वी बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर चौगुले कुटुंबीय सावरत होते. वडील मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होते. तर रामचंद्र हा सावंतवाडी-गवळी तिठा येथे पानस्टॉल चालवत होता. आठ दिवसांपासून त्याला ऍसिडीटीचा त्रास व पोटात दुखत होते. औषधे घेऊन बरे वाटले होते. मंगळवारी रात्री 10.30 च्या सुमारास त्याच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे मित्रांना घेऊन तो औषध घेण्यासाठी सावंतवाडीतील मेडिकलमध्ये आला. मात्र, मेडिकलमध्ये तो खाली कोसळून अत्यवस्थ झाला. तात्काळ त्याला उपचारासाठी मित्रांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कोलगाव येथील संजय धुरी यांनी पोलिसांत दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ भागवत, हवालदार डी. व्ही. नाईक, हिर्लेकर यांनी पंचनामा केला. बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामचंद्र हा मयूर नावाने ओळखला जात होता. त्याला क्रिकेटची आवड होती. त्याच्या पश्चात आई, वडील आहेत.









