प्रतिनिधी/ सातारा
दि.9 रोजीला महाराष्ट्रात तब्बल 15हजार कलावंतांच्या सहभागाने 39 ठिकाणी झालेल्या प्राथमिक फेरीत वैयक्तिक व सांघिक मिळून 78 संघ अंतिम फेरीत पोचले होते. परंतु राज्यातल्या ठाकरे सरकारने कोविडचं कारण पुढं करत शिवजयंती साजरी करण्यावर घातलेल्या बंधनांना झुगारत भाजपा सांस्कृतिक सेलने शिवगान स्पर्धेची अंतिम फेरी किल्ले अजिंक्यताराच्या साक्षीने साताऱयात पार पाडली. या स्पर्धेचा मानकरी ठरला रायगडचा संघ तर वैयक्तिकमध्ये नाशिक पटकावले विजेतेपद. विजेत्यांचा सन्मान खासदार उदयनराजे भोसले व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
भाजपा सांस्कृतिक सेलच्या वतीने घेण्यात आलेल्या शिवगान स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सोहळा साताऱयात पार पडला. याप्रसंगी भाजापाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, खासदार उदयनराजे भोसले, सांस्कृतिक सेलचे प्रदेश प्रमुख शैलेश गोजमगुंडे, माजी आमदार कांताताई नलावडे, ऍड. भरत पाटील, लक्ष्मण सावजी, नंदेश उमाप, सौ. विनता जोशी, विसुभाऊ बापट आदी मान्यवर उपस्थित होते. याचे पारितोषिक वितरण चंद्रकांतदादा पाटील व उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात पहिल्यांदाच फक्त शिवरायांवरील गीतांची स्पर्धा झाली. आपण शिवरायांच्या विचारांवर चाललो तरच हा देश महासत्ता होईल असे सांगत ते पुढे म्हणाले की, मी शिवरायांचा प्रत्यक्ष वंशज असलो तरी या देशातील प्रत्येक नागरिक हा शिवरायांचा वंशजच आहे. असं मी मानतो.
यावेळी चंद्रकांतदादा म्हणाले की, शिवरायांच्या नावाने मोठे होणारे आता अजान स्पर्धा भरवतात पण आम्ही शिवगान स्पर्धा भरवली. आमचा मुस्लीम समाजाला विरोध नाही, हिन्दु या शब्दातच सर्वधर्म समभाव दडलेला आहे. जे या राष्ट्राला मानतात, हिन्दुंचा सन्मान करतात. त्यांना आम्ही आपलेच मानतो. या वेळी परिक्षक नंदेश उमाप यांनी पोवाडा सादर केला तर दुसऱया परिक्षक स्वातत्र्यवीर सावरकारांची नात सौ. विनता जोशी यांनी शिवरायांची आरती सादर केली.
संबंध महाराष्ट्रातील गायक कलावंतांनी याला भरभरुन प्रतिसाद दिला. या स्पर्धेत समूह गायनातील एक लाख रुपये व स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्राचा मानकरी विजेता सामगंध कला केंद्र पनवेल जि. रायगड उत्तरचा संघ ठरला तर 75 हजार रुपये, 51 हजार व स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्राचा द्वितीय, तृतीय क्रमंकाचे विजेते अनुक्रमे शिवकल्याण राजा, बीड मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव हे ठरले तर एकवीस हजार स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्राचे उत्तेजनार्थ मानकरी अनुक्रमे गंधर्व पृथ्वीराज माळी, सांगली व स्वरश्री ठाणे हे ठरले. वैयक्तिक गीतगायन स्पर्धेत नाशिकची नेहा मूर्थी विजेती ठरली. तर द्वितीय व तृतीय क्रमांक आदित्य लिमये, रत्नागिरी व तृतीय आकांक्षा चारभाई नागपूर हिला मिळाला. तर उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय अश्लेषा कुलकर्णी जालना व सई ठकार हिला मिळाला.
वैयक्तिक पाच विजेत्यांना अनुक्रमे 41 हजार, 31 हजार, 21 हजार, 15 हजार, 7 हजार स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान केले गेले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक शैलेश गोजमगुंडे यांच्यासह पंकज चव्हाण, उमेश घळसासी, गितांजली ठाकरे, संचित यादव, राहुल वैद्य, सुनील सिन्हा, संजय भाकरे, विशाल जाधव, कुणाल गडेकर, नरेंद्र आमले, दीपक पवार, मयूर राजापुरे, काजल राऊत, चैत्राली घळसासी, शिरीष चिटणीस, वैशालीराजे घाडगे व साताऱयाच्या सांस्कृतिक सेलच्या टीमने मेहनत घेतली.









