अध्याय अकरावा
साधुपुरुष कसा ओळखायचा हे जाणून घेण्यासाठी उद्धव उत्सुक होता म्हणून भगवंत उद्धवाशी साधूंच्या लक्षणांबद्दल चर्चा करत आहेत. ते म्हणाले, ज्याच्याकडे तीतीक्षा म्हणजे सहनशीलता हा गुण असतो त्याला शांती प्राप्त होते. सत्य बोलायचे सामर्थ्य त्याच्यात असल्याने त्याचे अंतःकरण शुद्ध असते. सर्वांना समदृष्टीने पाहणे ह्या साधूंच्या सहाव्या लक्षणाबद्दल आता सांगतो. साधूला आत्मस्वरूपाचे ज्ञान झालेले असल्यामुळे समता प्राप्त झालेली असते, म्हणून तो सर्व प्राणिमात्रांना समान दृष्टीनेच पहात असतो. समुद्रात मिठाचा खडा टाकला म्हणजे तो जसा नाहीसा होऊन जातो, त्याप्रमाणे त्या साधूच्या अंतःकरणात विषमता पूर्णपणे नष्ट झालेली असते. समजा सोन्याचे अनेक प्रकारचे अलंकार विकत घेतले आणि ते पदार्थ मोडले नाहीत, तरी स्वभावतः ते सर्व सोनेच असते. त्याप्रमाणे नानाप्रकारचे आकार व नानाप्रकारची नावे यामुळे सर्व जग विषम दिसत असते परंतु साधु चित्स्वरूपामुळे ते सर्व जग समान स्वरूपात पहात असतो. आत्मज्ञानामुळे तो विषमता पहात नाही. अशा समसमान स्थितीमध्ये, दैवयोगाने सुख दुःखे प्राप्त झाली तरीही ईश्वराशी ऐक्मयभाव असल्याने त्याला त्यांचे काहीच वाटत नाही. ज्याप्रमाणे गंगा उजव्या बाजूने येऊन मिळालेल्या नदीला आणि डाव्या बाजूने येऊन मिळालेल्या गावच्या ओहोळाला त्यांच्यातील सर्व गुणदोष नाहीसे करून आपल्याशी एकरूप करताना, अमुक पवित्र आणि अमुक अपवित्र असे मुळीच म्हणत नाही. तसेच गोड पाणी आणि मचूळ पाणी अशा निरनिराळय़ा भेदांना गंगा आपल्या स्वरूपाने समरूपता आणते. त्याप्रमाणे सुखदुःखांची भावना साधूंना समदृष्टीच्या योगाने एकसारखीच असते. सदासर्वदा आत्मज्ञानाने परिपूर्ण असावयाचे, हेच संतांचे थोर लक्षण आहे. सगळीकडे एकच परमेश्वर निरनिराळय़ा रूपात वावरत असतो हे सोंगाडय़ाच्या उदाहरणावरून लक्षात येतं. ज्याप्रमाणे सोंगाडय़ा एकच असून तो गाय, वाघ, अशी निरनिराळी सोंगे घेतो. पण त्या सोंगामधला सोंगाडय़ा ओळखला की, त्या खेळातल्या सोंगांचा भ्रम नाहीसा होतो. त्याप्रमाणे सर्व प्रणिमात्रांची रूपे ईश्वरानेच घेतलेली आहेत हे मनावर ठसलं की, सगळीकडं आपोआपच साम्यदृष्टीने पाहता येतं. आणखी एक म्हणजे भय किंवा अभय ही भाषा केवळ द्वैताच्या भावनेनेच उठत असते. साधु हा द्वैताच्या ठिकाणी एकरूपतेने परिपूर्ण असल्यामुळे, भय आणि निर्भय हा भेद तो जाणत नाही. आता साधूचे परोपकार हे सातवे लक्षण ऐक. वृक्ष ज्याप्रमाणे पाने, फुले, छाया, फळ, साल, लाकूड इत्यादि प्रत्येक अंगाने लोकांना फलदायक होतो व सर्वावर नेहमी परोपकारच करीत असतो. त्यात काही भेदभाव करत नाही. त्याचे जो पालन करतो किंवा त्याला तोडण्यासाठी त्याच्यावर जो घाव घालतो, त्या दोघांनाही वृक्ष, फुलं व फळे देऊन सारखेच संतुष्ट करतो. वृक्षावर पानागणिक फळे आली तरी त्यापैकी एकही फळ तो वृक्ष स्वतः चाखून पाहात नाही. त्याप्रमाणे कर्मफळाला जो शिवत नाही, तो अनायासेच परब्रह्मस्वरूप होतो. तसंच कायावाचामनेकरून साधूही उपकाराकरिताच वाढलेला असतो. हे आपले किंवा हे दुसरे असे म्हणणे तो जाणतच नाही. सर्वांवर उपकार करणे एवढेच तो जाणतो.
चंद्र हा आकाशामध्ये उदय पावून ज्याप्रमाणे सर्व जगाचा अंधार नाहीसा करतो, विश्वाचा ताप दूर करतो व आपल्या किरणांनी सर्वांना शांत करतो. चंद्रापासून निघणारे अमृत चकोरांनीच प्राशन करावे आणि इतरांना ते देऊ नये असे काही चंद्र म्हणत नाही, जो ज्या भावनेने ईश्वराचे भजन करतो, तसे त्याला सुख प्राप्त होते. त्याप्रमाणे साधूपाशी जो जशी श्रद्धा धरतो, त्याला तो तसे तसे सुख देतो. ह्याप्रमाणे साधु सर्व जगावर उपकार करत असतो. कावळे चंद्राचा धिक्कार करतात व चकोर चंद्रामृत प्राशन करतात. त्याप्रमाणे दुष्ट असतात ते साधूचा धिक्कार करतात आणि भक्तिवान् असतात ते साधुसमागमाने आत्मलाभ पावतात. सातव्या गुणाचा विस्तार सांगतांना भगवंतांनी परोपकाराचे वर्णन केले.
क्रमशः







