पंतप्रधान मोदींसह बायडेन यांनी केले अभिनंदन
वृत्तसंस्था / टोकियो
जपानच्या संसदेने माजी विदेशमंत्री फुमिओ किशिदा यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून सोमवारी निवड केली आहे. किशिदा हे जपानचे 100 वे पंतप्रधान ठरले आहेत. जपानचे नवे पंतप्रधान किशिदा यांचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. जपान हा भारताचा महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार तसेच सर्वात विश्वासू सहकारी असल्याचे मोदींनी यावेळी नमूद केले आहे. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही किशिदा यांचे अभिनंदन केले आहे.
किशिदा यांनी योशिहिदे सुगा यांची जागा घेतली आहे. सुगा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने सोमवारी राजीनामा दिला होता. कोरोना महामारी हाताळण्यास अपयश आणि ऑलिम्पिकच्या आयोजनामुळे सुगा यांच्या लोकप्रियतेत घट झाली होती. जपानमध्ये 31 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे.
किशिदा यांच्यासमोर आता कोरोना महामारी आणि सुरक्षेशी संबंधित आव्हानांना हाताळण्याचे आव्हान आहे. आपली सर्वोच्च प्राथमिकता अर्थव्यवस्था राहणार असल्याचे किशिदा यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. लोकांचे उत्पन्न वाढविणे आणि विकास तसेच वितरणाचे एक चक्र निर्माण करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला आहे. जपानचे माजी विदेशमंत्री राहिलेले किशिदा यांनी सत्तारुढ लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या नेतेपदाची निवडणूक मागील आठवडय़ातच जिंकली होती. ही खऱया अर्थाने एक नवी सुरुवात असेल आणि मी भविष्यात येणाऱया आव्हानांना दृढ इच्छाशक्ती आणि दृढसंकल्पासह सामोरा जाऊ इच्छितो असे किशिदा यांनी सोमवारी म्हटले आहे. किशिदा यांनी शिंजो आबे यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात विदेशमंत्री म्हणून काम केले होते. जपानच्या प्रतिनिधिगृहाचे ते सदस्य आहेत.









