प्रतिनिधी/सातारा :
एकीकडे सातारा जिल्हय़ात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने सर्वांनाच चिंता लागून राहिली आहे. पोलीस प्रशासन नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करत आहे. मात्र, अद्यापही काहीजण मुर्खाच्या जगात वावरत असून साताऱयात बंदोबस्तावर असलेल्या होमगार्ड जवानांनी एका युवकाला मास्क लावण्यास सांगितल्याच्या कारणातून त्यांना जमाव जमवून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. पोलिसांवर हल्ले होण्याची ही साताऱयातील तिसरी घटना असून पोलिसांना आता कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.
सध्या पोलीस दलाने सातारा शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस रस्त्यावरची लढाई लढत असून कर्मचारी बळ कमी पडत असल्याने काही होमगार्डस जवानांना बंदोबस्तात सहभागी करुन घेण्यात आले आहे. सदरबझार येथील भीमाबई आंबेडकर झोपडपट्टी परिसरात बंदोबस्तावर असलेले दोन होमगार्डस जवान तिथे बाहेर पडणाऱयांना आत बसण्यास सांगत होते. यावेळी एक युवक तिथे होता त्याने मास्क देखील घातला नसल्याने त्याला त्यांनी मास्क घालण्यास सांगितले.
तो युवक तेथून निघून गेला आणि पुन्हा जमाव जमवून त्याच्यासह आलेल्या जमावाने दोन्ही होमगार्डस जवानांना मारहाण केली. ही घटना कळताच परिसरातील वातावरणात तणाव निर्माण झाला. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी तातडीने भेट दिली.
मारहाण करणाऱयांना पोलिसांनी झोपडपट्टीत घुसून शोधमोहीम राबवत ताब्यात घेतले. व सातारा शहर पोलीस ठाण्यात आणले. परिसरातील नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गांभीर्याने वागण्याचा सल्लाही पोलिसांनी दिला. दरम्यान, याप्रकरणी 3 महिला तसेच 14 पुरुषांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याने त्यांची नावे कळाली नाहीत.









