प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हय़ात यावर्षी आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे. गेल्या आठवडय़ापासून पावसाचा वेग मंदावला असून ऊन-पावसाचा खेळ सध्या सुरु आहे. बुधवारी सकाळपासून ऊन पडले होते मात्र सायंकाळनंतर पावसाने पुन्हा रिपरिप सुरु केली. अधूनमधून अचानकपणे हलक्या सरींची बरसात सातारा शहर व परिसरात सुरु होती.
ऑगस्टच्या मध्यावर पावसाचा वेग मंदावला आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे सातारा शहर व परिसरावर हिरव्यागार शालेची दुलई पसरली असून निसर्गाचा नजारा मनमोहक झाला आहे. गत दोन दिवसात पावसाने दडी मारली होती. अधूनमधून एखादी हलकी सर येवून जायची व परत ऊन पडत असल्याने श्रावणातील ऊन, पावसाचा लंपडाव सुरु होता.
बुधवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. मात्र दुपारनंतर हलक्या सरी कोसळत होत्या. सायंकाळनंतर पावसाची रिपरिप सुरु झाल्याने मग शहरात नागरिक रेनकोट, छत्र्या घेवून बाहेर पडत होते. अचानकपणे कोसळणाऱया सरींमुळे अनेकांची धांदल उडत होती. हवेत गारवा निर्माण झाला असून सातारा शहरात सध्या डेंग्यूने चांगलेच थैमान घातले आहे. अनेक डेंग्युमुळे आजारी असल्याने दवाखान्यात उपचार घेत आहेत. कधी ऊनामुळे उकाडा तर पावसामुळे गारवा अशा वातावरणात व्हायरल इन्फेक्शन वाढत असून त्यातच शहरात कोरोना संसर्ग कमी होत नसल्याने नागरिक पॅनिक आहेत.









