11 सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानातून सर्व सैनिक हटविण्याचा अल्टिमेटम
वृत्तसंस्था / काबूल
अफगाणिस्तानवर कब्जा केल्यावर तालिबान या दहशतवादी संघटनेने आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाच इशारा दिला आहे. 11 सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानातून सर्व सैनिक मागे घेण्याचा अल्टिमेटम तालिबानने अमेरिकेला दिला आहे. सद्यकाळात अमेरिकेचे अफगाणिस्तानात सुमारे 10 हजार सैनिक आहेत.
अफगाणिस्तानात सध्या सुरू असलेले संकट पाहता तेथील काबूल विमानतळावर अमेरिकेचे नियंत्रण आहे. अमेरिकेच्या वायुदलाकडून देश सोडून जाऊ पाहणाऱया अफगाणी नागरिक, विदेशी नागरिक आणि अन्य देशांचे राजदूत तसेच राजनयिक अधिकाऱयांना देशाबाहेर काढले जात आहे.
अफगाणिस्तानात तालिबानचे क्रौर्य रुप आता समोर येऊ लागल्याने तेथील नागरिकांमध्ये अधिकच दहशत निर्माण झाली आहे. यातून देशाबाहेर जाऊ पाहणाऱया नागरिकांची संख्या वाढली आहे. अशा स्थितीत काबूलच्या विमानतळावर अमेरिकेचे नियंत्रण असणे मानवाधिकाराच्या दृष्टीकोनातून आवश्यक आहे.
गनी यांनी घेतला युएईमध्ये आश्रय मानवतावादी दृष्टिकोनातून केले स्वागत
अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या हस्तक्षेपानंतर पोबारा केलेल्या राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) आश्रय घेतला आहे. युएईच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने याची पुष्टी दिली आहे. मात्र, युएईच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने त्यांच्या सध्या ठावठिकाण्याबाबत सविस्तर माहिती जारी केलेली नाही. मानवतावादी मूल्यांच्या आधारे अशरफ गनी आणि त्यांच्या कुटुंबाला देशात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
तालिबान काबूलमध्ये पोहोचताच अशरफ गनी अफगाणिस्तानातून पळून गेले होते. ते सुरुवातीला अफगाणिस्तान सोडून ताजिकिस्तान किंवा उझबेकिस्तानला गेल्याची चर्चा होती. त्याचदरम्यान तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर ते अमेरिकेतील जातील अशी अटकळही व्यक्त केली जात होती. मात्र, आता ते युएईमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.









