के. आर. शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
के आर शेट्टी स्पोर्ट्स फोंडेशन आयोजित के. आर. शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने बीसीसी मच्छे संघाचा 43 धावांनी तर अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने झेवर गॅलरी डायमंड संघाचा 78 धावानी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. मनिकांत बुकीटगार (साईराज), वैष्णव संघमित्र (हुबळी टायगर्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर के. आर. शेट्टी टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात साईराज वॉरियर्सने 20 षटकात 7 बाद 146 धावा केल्या. मनिकांत बुकीटगारने 5 चौकारासह 58, सुजय सातेरीने 4 चौकारासह 24, नरेंद्र मांगुरे व अभिषेक देसाई यांनी प्रत्येकी 1 चौकार 1 षटकारासह 23 धावा केल्या. बीसीसी मच्छेतर्फे भरत गाडेकरने 23 धावात 5, आकाश असलकर व मनोज पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीसीसी मच्छे संघाचा डाव 16.1 षटकात सर्व बाद 103 धावात आटोपला. शिवप्रसाद हिरेमठने 7 चौकारासह 36, वेंकटेश शिराळकरने 2 चौकारासह 17, अमर घाळीने 1 षटकार 1 चौकारासह 12 धावा केल्या. साईराजतर्फे कृष्णा बागादीनीने 13 धावात 3, दीपक राक्षेने 17 धावात 2, नरेंद्र मांगुरेने 18 धावात 2, ओमकार वेर्णेकर व शुभम गौंडाडकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर संघाने 20 षटकात 1 बाद 188 धावा केल्या. परिक्षित उकुंडीने 1 षटकार 6 चौकारासह 69, वैष्णव संघमित्रने 3 षटकार 4 चौकारासह 35 चेंडूत 62 धावा करून दोघांनी अर्धशतके झळकवली. परिक्षित व वैष्णव यांनी पहिल्या गडय़ासाठी 108 धावांची भागीदारी केली तर स्वप्निल हेळवे व परिक्षित उकुंडी यांनी दुसऱया गडय़ासाठी नाबाद 80 धावांची भागिदारी केली. त्याला स्वप्निल एळवेने 2 षटकार 3 चौकारासह 45 धावा करून सुरेख साथ दिली. झेवर गॅलरीतर्फे ताहिर सराफने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना झेवर गॅलरी डायमंड संघाचा डाव 19.2 षटकात सर्व बाद 110 डावात आटोपला. अमेय भातकांडेने 1 षटकार 5 चौकारासह 38, माजीद मकानदारने 1 षटकारासह 17, नागेंद्र पाटीलने 2 चौकारासह 16 धावा केल्या. हुबळी टायगर्सतर्फे वसंत शहापूरकरने 22 धावात 3, ज्ञानेश होनगेकरने 13 धावात 2, नंदकुमार मलतवाडकरने 17 धावात 2 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे महेश फगरे, विजय कुरी, इरन्ना, फैजान खान यांच्याहस्ते सामनावीर मनिकांत बुकीटगार, इम्पॅक्ट खेळाडू भरत गाडेकर, सर्वाधिक षटकार अभिषेक देसाई, उत्कृष्ट झेल दीपक नार्वेकर तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे रोहण सुंठणकर, यतेंद्र देशपांडे, सुदर्शन जाधव, आसिफ यांच्या हस्ते सामनावीर व सर्वाधिक षटकार वैष्णव संघमित्र, इम्पॅक्ट खेळाडू परिक्षित उकुंडी, उत्कृष्ट झेल सर्फराज मुल्ला यांना चषक व नागेश छाब्रिया यांच्या हस्ते पुरस्कृत केलेला मेट्रो कास्ट डिजिटल बॉक्स देवून गौरविण्यात आले.









