बंधाऱयात बुडालेली कार आज बाहेर काढणार
प्रतिनिधी / बांदा:
गाळेल येथे दरडीखाली गाडल्या गेलेल्या युवकाच्या शोध मोहिमेला गुरुवारी सहाव्या दिवशीही अपयश आले. गेले सहा दिवस वेंगुर्ल्यातील शेकडो ग्रामस्थ ठाण मांडून आहेत. शुक्रवारी या घटनेला आठ दिवस पूर्ण होणार आहेत. आजही बॉम्ब स्कॉड, एनडीआरएफ, पोलीस आणि महसूल प्रशासन शोध मोहिमेत सहभागी होते. दुर्घटनेत बंधाऱयाच्या पाण्यात बुडालेली मोटार उद्या, शुक्रवारी चित्रीकरण करून काढण्यात येणार असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले. एनडीआरएफच्या जवानांनी गुरुवारी पाण्यात उतरून मोटारीची पाहणी केली.
शुक्रवारी सकाळी बांदा-डिंगणे रस्त्यावर गाळेल येथे डोंगर खचल्याने मोटार व दुचाकी गाडली गेली आहे. कार फरफटत येऊन बंधाऱयाच्या खोल पाण्यात बुडाली आहे. या मोटारीबाबत अनेक शंका व अफवा पसरल्याने ती बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी जवानांनी पाण्यात जाऊन मोटारीचा अंदाज घेतला. मोटार दहा फूट खोल पाण्याखाली आहे. गुरुवारीही दिवसभर माती बाजूला काढून बेपत्ता युवकाचा शोध घेण्यात आला. मात्र शोधमोहिमेला अपयश आले. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधमोहिमेला प्रारंभ करण्यात येणार आहे.









