कोटकामते सरपंचांचा आरोपः कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याची स्पष्टोक्ती
वार्ताहर / देवगड:
कोटकामते उपसरपंच व त्यांच्यासमवेत असणारे काही निवडक लोक वेगवेगळय़ा पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरातबाजी करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी आपल्याला धमकावण्यात येत आहे. माझ्या कुटुंबालाही धमकावण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप कोटकामते सरपंच सौ. सायली प्रदीप पारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. तसेच आपल्याकडून ग्रामपंचायतीच्या कारभारात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सौ. पारकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, 30 मार्च 2021 रोजी ग्रामसेवक दीपक केतकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झाली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या संपूर्ण आर्थिक व्यवहाराची माहिती काही लोकांनी माहितीच्या अधिकारात मागविण्यास सुरुवात केली. प्राप्त अर्जानुसार संपूर्ण माहिती ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने देण्यात येत आहे. तसेच वरिष्ठ कार्यालयाच्या माध्यमातून तपासणी केली जात असून तसा अहवालही लवकरच प्राप्त होईल. नियमानुसार योग्य कार्यवाही सुरू असताना उपसरपंच व अन्य काही ग्रामस्थ वेगवेगळय़ा प्रकारे आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी सोशल मीडियाचा व वृत्तपत्राचा वापर केला जात आहे. माझ्याकडून कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. मोठय़ा गुन्हेगारांना पाठिशी घालण्यासाठी मला वेळोवेळी फोन करून तसेच वैयक्तिक संदेश पाठवून सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी धमकाविण्यात येत आहे. माझ्या कुटुंबालाही रात्री 11 वाजता फोन करून धमकाविण्यात आले, असेही त्यांनी म्हटले आहे.
मनोबल खच्चीकरणाचा प्रयत्न
गावातील कोरोना परिस्थितीमुळे आपण याकडे दुर्लक्ष करीत होतो. कोरोना काळात सरपंच म्हणून आपण व प्रशासक असे दोघेच काम करीत होतो. कोरोना नियंत्रण ग्रामदक्षता समितीच्या सभेला वेगळा भत्ता दिला, तरच सभेला येऊ असे इतिवृत्तामध्ये नमूद करण्यास सदस्यांनी भाग पाडले. ग्रा. पं. सदस्यांच्या आणि काही निवडक ग्रामस्थांनी आपल्याला मानसिक त्रास देऊन जबरदस्तीने राजीनामा घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महिला सरपंचाचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न काहींकडून केला जात आहे. याबाबत आपण लवकरच पुढील भूमिका घेणार आहोत, असेही सरपंच पारकर यांनी पत्रकात म्हटले आहे.









