न. प. कर्मचाऱयांकडून 35 जणांवर अंत्यसंस्कार
जान्हवी पाटील/ रत्नागिरी
zसमाजामध्ये उलथापालथ घडवणाऱया कोरोना व्हायरसने काही ठिकाणी माणसाला माणसापासून दूर केले तर काही ठिकाणी याच रोगाने अनोळखी व्यक्तीमधील माणुसकीची ज्योत प्रकाशमान केली. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर समाज तर सोडाच काही वेळा घरचेही चार हात लांब राहणेच पसंत करतात. त्यात शासकिय निकषांमुळे इच्छा असूनही मर्यादा पाळाव्या लागतात. अशा परिस्थिती नगर परिषद कर्मचारीच मृतांचे ‘मुले’ बनून त्यांचा अंतिम प्रवास निवीघ्न करण्यासाठी जीवाची बाजी लावत आहे. कोरोनाच्या युद्धात डॉक्टर, पोलीस यांचे योगदान महत्वाचे आहेच, पण प्रकाशझोतात न येताच अंत्यविधी पार पाडणाऱया रत्नागिरी नगर परिषदेच्या कर्मचाऱयांचे योगदानही तेवढेच अमूल्य आहे.
जिल्हय़ात कोरोनाच्या वाढत्या फैलावाबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. आजपर्यंत जिल्हय़ात 44 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून बहुतांश जणांनी रत्नागिरी जिल्हा कोव्हीड रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. शासकीय निर्देशानुसार सुरक्षीततेचा भाग म्हणून जेथे मृत्यू झाल्या तेथून नजीकच्या स्मशानभूमीत त्यावर अंत्यसंस्कार करणे अपेक्षीत आहे. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेच्या चर्मालय व मिरकरवाडा या नजीकच्या स्मशानभुमीतच कोरोनाबाधीत मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. ही जबाबदारी नगर परिषद कर्मचाऱयांना परा पाडावी लागते.
शासकीय नियम व काही वेळा समाज व कोरोनाबाबतची भीती यामुळे नातेवाईकांना मृतावर अंत्यसंस्कारांपासून दूरच राहावे लागते. यावेळी दोघांनी उपस्थित राहण्याची परवानगी असली तरी अनेकदा त्यालाही कुटुबीयांकडून नकारच मिळतो. अशावेळी नगर परीषद कर्मचारीच त्यांची मुले व नातेवाईक बनून कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करत आहेत. रत्नागिरी नगर परिषद आणि जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱयांनी आतापर्यंत 35 जणांवर अंत्यसंस्कार करून अनोख्या मानवतेचे दर्शन घडवले आहे.
कोरोनाग्रस्त रूग्णांना बरे करण्यासाठी आरोग्य विभागातील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. मात्र अन्य आजार असलेल्या रूग्णांना धोका अधिक असतो. उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर काही नातेवाईक रूग्णालयाकडे फिरकतसुध्दा नाही. काही प्रशासकीय कार्यवाहीसाठीही उपस्थित राहण्यास नकार येतो. कोरानाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन व्यक्तींनी पीपीई कीट घालून उपिस्थित राहाण्यास परवानगी असते. त्यासाठी पीपीई कीट रूग्णालयाकडून पुरवले जाते मात्र तरीदेखील काही नातेवाईक भीतीमुळे जात नाहीत. मृत्यूनंतरच्या कायदेशीर सोपस्कारचे पत्रही काहीजण प्रत्यक्ष न देता व्हॉटसअप, मेलवर पाठवतात. इतकी कोरोनाची दहशत असताना आपला जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कार करत असल्याने हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.
†िंजल्हा शासकीय रूग्णालयातून कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे कळवल्यानंतर नगर परीषद कर्मचाऱयांची टीम पुढील तयारीसाठी सज्ज होते. तेरा जणांच्या दोन पथकांमार्फत अंत्यविधी केले जातात. मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना कर्मचारी स्वत:च्या सुरक्षेसाठी लागणारे पीपीई कीट परिधान करतात. निर्जतुकीकरण केल्यानंतरच कुटुंबात जात असल्याचे कर्मचारी सांगतात.
न. प. पथकाच्या कार्याला सलाम
वाहन विभाग प्रमुख जितेंद्र विचारे, स्वच्छता निरीक्षक आरीफ शेख, संदेश कांबळे, किरण सावर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रितम कांबळे, दिनेश जाधव, मनोहर कदम, संजय मकवाना, योगेश मकवाना, योंगेंद्र जाधव, विशाल राठोड, बबन बेटकर, संदिप सावंत, ज्ञानेश कदम, प्रभाकर कांबळे हे दोन पथकांच्या माध्यमातून कोरानाच्या मृत झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. त्यांच्या या कार्याला सलाम.









