7 किमीच्या कक्षेतील रणगाडे नष्ट करण्यास सक्षम
बालासोर :
भारतीय सैन्याने ओडिशाच्या बालासोरमध्ये ध्रुवास्त्र या दिशानिर्देशित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ध्रुवास्त्र सैन्याच्या ताफ्यात यापूर्वीच सामील नाग क्षेपणास्त्राची अत्याधुनिक आवृत्ती आहे. हे क्षेपणास्त्र 7 किलोमीटरच्या कक्षेतील शत्रूच्या रणगाडय़ांना उद्ध्वस्त करू शकते. थारच्या वाळवंटात मागील वर्षी रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र नागच्या तिसऱया आवृत्तीची 12 दिवसांपर्यंत चाचणी करण्यात आली होती. हे क्षेपणास्त्र ‘डागा आणि विसरा’ या तत्वावर काम करते. म्हणजेच हे क्षेपणास्त्र डागण्यात आल्यावर कुठल्याही कमांडची गरज भासत नाही आणि ते अचूकपणे स्वतःचे लक्ष्य भेदते. नाग क्षेपणास्त्र कुठलाही रणगाडा नष्ट करू शकते. डागण्यात आल्यावर हे क्षेपणास्त्र स्वतःच्या ऑपरेटरजवळ पूर्ण भागातील छायाचित्रेही पाठवत राहते. या वैशिष्टय़ामुळे क्षेत्रातील शत्रूच्या रणगाडय़ांची संख्या उमगू शकते. याच्या आधारावर दुसरे क्षेपणास्त्र डागून अन्य रणगाडे नष्ट केले जाऊ शकतात. हे क्षेपणास्त्र एकावेळी 8 किलोग्रॅम वजनी अस्त्रांना वाहून नेऊ शकते. 230 मीटर प्रति सेकंदाच्या वेगाने हे क्षेपणास्त्र स्वतःच्या लक्ष्याचा भेद करते.









