इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. ज्योती पाटील यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / बेळगाव
समाजाच्या गरजा ओळखून इनरव्हील क्लब ऑफ बेळगावने सातत्याने काम केले आहे. कोरोना काळात इनरव्हील क्लबमुळे अनेक गरजूंना मदत पोहोचलेली आहे. हीच परंपरा क्लबने कायम ठेवावी आणि समाजाच्या गरजांची पूर्तता करावी, असे मत इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन ज्योती पाटील यांनी व्यक्त केले.
इनरव्हील क्लब बेळगावला त्यांनी बुधवारी भेट दिली. त्यावेळी मेसॉनिक हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर क्लबच्या अध्यक्षा शर्मिला कोरे, सचिव मंजिरी पाटील, रत्ना बेहरे, डॉ. सुषमा शेट्टी, अनुपा रजपूत, दिव्या मोहता आदी उपस्थित होत्या.
डॉ. ज्योती पाटील यांनी क्लबने रंगवून दिलेल्या गोडसेवाडी येथील शाळेची पाहणी सकाळी केली. त्यानंतर संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात क्लबच्या कार्याची प्रशंसा केली. इनरव्हील क्लब ही महिलांची जगातील तिसरी मोठी संस्था आहे, असे सांगितले.
प्रारंभी तुळसा पाटील यांनी इनरव्हीलची प्रार्थना सांगितली. त्यांनी अहवाल वाचन केले. क्लबच्या अध्यक्षा शर्मिला कोरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. बेला शिवलकर यांनी ज्योती पाटील यांचा परिचय करून दिला. सचिव मंजिरी पाटील यांनी अहवाल सादर केला. यानंतर नागवेणी या विद्यार्थिनीला क्लबतर्फे अर्थसाहाय्य करण्यात आले. अवयवदानांतर्गत स्वदान उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल स्वाती कुलकर्णी, शीतल गोगले, शिवराज कुणाल जोशी, हरिश कारपाणी यांचा सत्कार करण्यात आला.
व्हाईस डिस्ट्रिक्ट चेअरमन रत्ना बेहरे संपादित बुलेटीनचे प्रकाशन डॉ. ज्योती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. लता कित्तूर यांनी इनरव्हील परिषदेचा वृत्तांत सादर केला. वाढदिवस असणाऱया सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. सुचेता बागी यांनी लकी लेडीचे नाव जाहीर केले. सूत्रसंचालन तेजस्विनी हजारे व शलाका हिंगोराणी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सुषमा शेट्टी यांनी केले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.









