मनपा महसूल विभागाच्या अधिकाऱयांना प्रशिक्षण : सध्याच्या किमतीच्या 25 टक्के रकमेवर घरपट्टी बसविण्याचा आदेश
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील मालमत्तांच्या घरपट्टीची आकारणी जागेच्या दरानुसार निश्चित केली जाते. याकरिता 2005 मध्ये उपनोंदणी खात्याने जाहीर केलेल्या किमतीच्या 50 टक्के रकमेवर घरपट्टी आकारण्यात येत होती. मात्र सध्याच्या किमतीच्या 25 टक्के रकमेवर घरपट्टी बसविण्याचा आदेश नगरविकास खात्याने बजावला आहे. त्यामुळे घरपट्टीच्या आकारणीत मोठा बदल होण्याची शक्मयता आहे.
मालमत्ता कर आकारणी बदल करण्याची सूचना नगरविकास खात्याने महापालिका प्रशासनाला केली आहे. याकरिता गुरुवारी महसूल विभागाच्या अधिकाऱयांना आणि महसूल निरीक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले.
महापालिकेने 2003 पासून स्वयंघोषित कर आकारणी पद्धत लागू केली आहे. या पद्धतीला मालमत्ताधारकांचा आक्षेप होता. या कर प्रणाली विरोधात लढा पुकारण्यात आला होता. मात्र शासनाच्या बडग्यापुढे सर्वसामान्य नागरिकांचे काहीच चालले नाही. त्यामुळे बेळगाव महानगरपालिकेने 2005 पासून स्वयंघोषित कर आकारणीची पद्धत केली आहे. मात्र 2003 ते 2005 या दरम्यान स्वयंघोषित कर आकारणी करण्यात आली नाही. त्यामुळे ही फरक रक्कम देखील वसूल करण्याचा आदेश नगरविकास खात्याने केला होता. त्यामुळे प्रत्यक्षात 2003 पासून स्वयंघोषित कर आकारणीनुसार मालमत्तांचा कर घेतला जातो. प्रत्येक 3 वर्षांतून एकदा 15 ते 30 टक्क्मयांची वाढ करण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे 3 वर्षाला एकदा 15 टक्के करवाढ करण्यात येते. उपनोंदणी खात्याने घोषित केलेल्या किमतीच्या आधारावर स्वयंघोषित कर आकारणीनुसार घरपट्टी बसविण्यात आली आहे. 2005 मध्ये उपनोंदणी खात्याने जाहीर केलेल्या जागेच्या किमतीवर 50 टक्के प्रमाणे किमत ठरवून त्यावर कर बसविण्यात आला होता. मात्र आता हा फॉर्मुला बदलण्याचा आदेश नगरविकास खात्याने बजावला आहे.
उपनोंदणी खात्याने सध्या जाहीर केलेल्या किमतीच्या 25 टक्के रकमेवर घरपट्टी आकारण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे घरपट्टी आकारणीत मोठा बदल होण्याची शक्मयता आहे. सध्या शहरातील जागांचे दर गगनाला पोहोचले आहेत. प्रत्येक परिसरात उपलब्ध असलेल्या सुविधांनुसार उपनोंदणी खात्याने जागेचे दर जाहीर केले आहेत. त्यामुळे घरपट्टी कमी-जास्त होण्याची शक्मयता आहे.
नगरविकास खात्याचे महापालिकेला पत्र उपनोंदणी खात्याने सध्या जाहीर केलेल्या जागेच्या किमतीनुसार घरपट्टी आकारणी करण्यासाठी नगरविकास खात्याने महापालिकेला पत्र पाठविले आहे. तसेच सदर घरपट्टी कोणत्या पद्धतीने आकारायची याबाबतचे प्रशिक्षण महसूल विभागाच्या अधिकाऱयांना गुरुवारी देण्यात आले. ऑनलाईनद्वारा नगरविकास खात्याने हे प्रशिक्षण दिले. त्यामुळे महापालिका आता सध्याच्या जागेच्या दरानुसार घरपट्टी ठरविणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याकरिता महापालिका प्रशासकांना ठराव मंजूर करावा लागणार आहे. या प्रणालीनुसार घरपट्टीत कोणता बदल होणार याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱयांनी दिली नाही. मात्र या नव्या पद्धतीने कर आकारणी सुरू केल्यास सर्वसामान्यांना घरपट्टी किती बसेल हे समजणार आहे.









