प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंटचे लोकनियुक्त सभागृह बरखास्त करण्यात आले असून, सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. स्टेशन कमांडंट, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जनतेतून प्रतिनिधीची नियुक्ती करण्यासाठी तीन नागरिकांचे अर्ज पाठविण्याचा आदेश सदर्न कमांड पुणे यांनी पाठविला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकालावधी संपुष्टात आल्याने सभागृह बरखास्त करण्यात आले आहे. सभागृह बरखास्त केल्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डचे कामकाज पाहण्यासाठी दोन प्रशासकीय अधिकारी आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात येईपर्यंत कारभार पाहण्याची जबाबदारी या सदस्यांवर असते. कॅन्टोन्मेंट बोर्ड लोकनियुक्त सभागृह बरखास्त केल्यानंतर स्टेशन कमांड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचा आदेश सदर्न कमांडने बजावला होता. मात्र लोकप्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आली नव्हती. सदर निवड करण्यासाठी तीन नागरिकांचे अर्ज घेण्यात येतात. मात्र आतापर्यंत कोणतीच प्रक्रिया झाली नव्हती. बुधवार दि. 3 रोजी सदर्न कमांडने कॅन्टोन्मेंट बोर्डला पत्र पाठवून जनतेमधून सदस्य नियुक्तीसाठी तीन नागरिकांची नावे पाठविण्याची सूचना केली आहे. सदर नागरिकांचा संपूर्ण बायोडाटा पाठविण्यात यावा, मात्र या व्यक्ती कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत राहता कामा नये. व कॅन्टोन्मेंट बोर्डवर काम करण्यासाठी इच्छुक असावेत. दि. 19 मार्च पूर्वी सदर नावे सदर्न कमांड पुणे यांच्याकडे पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे जनतेमधून तीन नागरिकांची नावे पाठवावी लागणार आहेत.









