बोगस लाभार्थींवर होणार कारवाई : अद्यापही धनाढय़ कुटुंबीयांकडून दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकौंटंट यांच्या कुटुंबातील सदस्य अथवा आयकर भरणाऱया व्यक्ती, चार चाकी वाहन असणारे, पेन्शनर, शासकीय नोकरदार यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी अन्नभाग्य योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा खाते व जिल्हाधिकाऱयांनी केले होते. मात्र, अद्यापही धनाढय़ कुटुंबीयांकडून याकडे दुर्लक्ष करून रेशनचा लाभ घेतला जात आहे. या सर्वांनी आपली रेशनकार्डे खात्याकडे जमा करावीत, असे आवाहन खात्याने केले आहे.
काहींनी खोटी माहिती देऊन बीपीएल कार्डे मिळविली आहेत. अशा बोगस लाभार्थींवर आता कारवाई केली जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने कारभार पारदर्शी करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. गरजू-गरीब, हातगाडीवाले, स्वच्छता कर्मचारी, भूमीहीन, अल्पभूधारक कामगार, झोपडपट्टीत राहणारे, हमाल आदींचा अन्नभाग्य योजनेच्या बीपीएल कार्डमध्ये समावेश होतो. यांनीच या योजनेचा लाभ घेणे आवश्यक असताना अद्यापही अनेक धनाढय़ व सधन कुटुंबीय या योजनेचा लाभ घेत आहेत. खात्याकडून अशा लोकांचा सर्व्हे करण्यात येत असून बोगस कार्डधारक सापडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
आधार व मोबाईल क्रमांक रेशनकार्डशी लिंक करणे बंधनकारक
एक राष्ट्र एक रेशनकार्ड या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी आधार व मोबाईल क्रमांक रेशनकार्डला लिंक करणे बंधनकारक आहे. या योजनेमुळे कार्डधारकाला किमान एक मोबाईल क्रमांक रेशनकार्ड आणि आधारकार्डशी संलग्न करावा लागणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली आहे. जवळच्या रेशनकार्ड दुकानात जावून कार्डधारकांनी आपला आधार व मोबाईल क्रमांक लिंक करावा, असे आवाहन खात्याने केले आहे.









