ऑनलाईन टीम / पुणे :
मुक्तांगणच्या संस्थापिका डाॅ. अनिता अवचट यांचा 10 फेब्रुवारी रोजी स्मृतीदिन असून यानिमित्त दिला जाणारा डाॅ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान यंदा नांदेड जिल्ह्यातील किनवट सारख्या अतिदुर्गम भागात रुग्णालयाची उभारणी करणारे डॉ. अशोक बेलखोडे आणि स्वतःवर ओढावलेल्या संकटांचा स्विकार करत त्याचे संधीत रुपांतर करणारे बहुविकलांग टिंकेश काैशिक या दोघांना देण्यात येणार आहे, अशी माहिती मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक मुक्ता पुणतांबेकर यांनी कळवली आहे.
हा कार्यक्रम रविवार दिनांक 7 फेेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4.00 (चार) वाजता, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, मोहनवाडी, प्रतीक नगर, आळंदी रोड, विश्रांतवाडी, पुणे येथे होणार आहे. प्रत्येकी रूपये वीस हजार आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि अभिनेते डाॅ. मोहन आगाशे भूषविणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डाॅ. आनंद नाडकर्णी पुरस्कारर्थींशी संवाद साधत त्यांचा संघर्षमय जीवनपट उलडगणार आहेत.
डॉ. अशोक बेलखोडे यांनी हॅलो संघटना आणि भारत जोडो यात्रा या उपक्रमांच्या माध्यमातून सामजिक कार्याचा आदर्श निर्माण केला आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट सारख्या आदिवासी, डोंगराळ आणि अतिदुर्गम भागात साने गुरूजी रूग्णालयाची उभारणी करून त्या परिसरातील आदिवासी, बंजारी आणि वंचितांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा डाॅ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान करण्यात येणार आहे.
टिंकेश कौशिक यांना ट्रिपल अम्प्युटी हा आजार असूनही जिम ट्रेनर, पॅरा सायकलिंग, बजी जंपिंगसारखे धाडसी खेळात त्यांनी कौशल्य संपादन केले असून त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
कोविड-19 च्या पार्श्वभुमिवर पुरस्कार वितरण सोहळा आणि पुरस्कार प्रदानानंतर होणारा संवादाचा कार्यक्रम मुक्तांगणच्या फेसबुक पेजवर लाईव्ह प्रक्षेपित केला जाणार आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण रविवार दिनांक 7 फेेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत होणार आहे.








