विकेंड कर्फ्यूचा परिणाम : अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद
प्रतिनिधी /बेळगाव
राज्य सरकारच्या आदेशानुसार बेळगाव शहरासह परिसरात रविवारी देखील विकेंड कर्फ्यू करण्यात आला. सकाळी खरेदीसाठी वर्दळ होती. तर दुपारनंतर निर्बंध असल्याने सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू असल्याने नोकरदारांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.
सीमावर्ती जिल्हय़ांमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून विकेंड कर्फ्यूला सुरुवात झाली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी दुपारी 2 पर्यंत मुभा देण्यात आली होती. फळे, भाजीपाला, दूध, मेडिकल, अन्न पदार्थ विक्रीची परवानगी होती. त्यामुळे दुपारी दोनपर्यंत बेळगाव शहर व उपनगरांमध्ये खरेदीसाठीची गर्दी दिसून आली.
गणपत गल्लीतील दुकाने दुपारी 1 वाजताच बंद
राज्य सरकारच्या आदेशानुसार दुपारी 2 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. परंतु खडेबाजार पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी दुपारी 1 वाजताच दुकाने बंद करून नागरिकांनाही गणपत गल्ली, मारुती गल्ली, कांदा मार्केट येथून हुसकावण्यास सुरुवात केली होती. यामुळे विपेत्यांमधून नाराजी उमटत होती.आधीच कोरोना महामारीमुळे व्यवसाय कमी आहे. त्यात पोलीस त्रास देत असल्याने विपेते संतापले आहेत.
मांसाहारी पदार्थांची विक्री घटली
रविवारी गटारी असल्याने मोठय़ा प्रमाणात मटण, चिकन व मासे खरेदी होईल असा अंदाज व्यक्त होत होता. परंतु विकेंड कर्फ्यूमुळे खरेदीला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. मागील वषीपेक्षा निम्मी विक्री देखील झाली नसल्याचे विपेत्यांनी सांगितले. मटण 640 रुपये, चिकन 210 रुपये प्रति किलो दराने विक्री करण्यात आले. फिश मार्केट परिसरात देखील म्हणावा तितका खरेदीचा उत्साह दिसून आला नाही.
शहरात सामसूम, उपनगरांमध्ये व्यवहार सुरू
एकीकडे शहरात विकेंड कर्फ्यूची कडक अंमलबजावणी सुरू असताना उपनगरांमध्ये मात्र दिवसभर सर्व व्यवहार सुरू होते. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय केवळ शहरापुरताच का, असा प्रश्न शहरातील व्यापारी उपस्थित करत होते. नियमांची कडक अंमलबजावणी करायचीच असेल तर शहरासह उपनगरांतही करावी, अशी मागणी करण्यात आली.









