सेन्सेक्स 361 अंकांनी तेजीत, धातू क्षेत्रातील कंपन्या नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील सकारात्मक कल भारतीय शेअर बाजारासाठी मंगळवारी फलदायी ठरला. धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या दमदार कामगिरीमुळे सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक वधारासह बंद झाल्याचे पाहायला मिळाले.
चीनमध्ये कोरोना जोरदार हात-पाय पसरत असला तरी भारतात मात्र काळजी करण्याचे कारण नसल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ञांकडून सांगितले जात असल्याने त्याचे परिणाम शेअरबाजारावर पाहायला मिळाले. मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 361 अंकांच्या वधारासह 60,927 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 117 अंकांनी वाढत 18,132 अंकांवर बंद झाला होता. दिवसभराच्या सत्रामध्ये सेन्सेक्स निर्देशांकाने 60,406 निच्चांकी आणि 60,987 अंकांची उच्चांकी गाठली होती. सेन्सेक्समधील 30 समभागांमध्ये टाटा स्टील सर्वाधिक 6 टक्के इतका वाढताना दिसला. याच्यासोबत एशियन पेंटस्, विप्रो, लार्सन टुब्रो, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस यांचे समभाग तेजीसह बंद झाले. दुसरीकडे हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी आणि एचडीएफसी यांनी मात्र नकारात्मक कल दर्शविला. मिडकॅप निर्देशांक 0.7 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 1.5 टक्के इतका वधारला होता. कमोडिटी, टेलिकॉम, तेल व गॅस त्याचप्रमाणे ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांनी बाजारात दमदार कामगिरी नोंदवली. याचा आधार शेअर बाजाराला तेजी राखण्यामध्ये मिळाला. बाजारात एचईजीचा समभाग 8 टक्के इतका वाढला होता.
जागतिक बाजारात उत्साह
जागतिक बाजारामध्ये पाहता अमेरिकेतील बाजार तेजीमध्ये पाहायला मिळाले. डो जोन्स 176 अंकांनी तर नॅसडॅक निर्देशांक 21 अंकांनी तेजीत होता. युरोपियन बाजार देखील तेजीमध्ये कार्यरत होते. आशियाई बाजारामध्ये निक्की 42 अंकांनी, कोस्पी 15 अंकांनी, सेट कम्पोझिट 16 अंकांनी, शांघाई कम्पोझिट 30 अंकांनी वधारत होता.









