प्रतिनिधी/ पणजी
संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद केलेला नाही आणि तसा काणताही निर्णय झाला नसल्याची माहिती सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी दिली. गोवा डेअरीवर योग्य माणसांची वर्णी लावण्यात आली असून तेथील कारभार सुधारण्याची अपेक्षा त्यांनी प्रकट केली. सहकारी बँक क्रेडिट सोसायटीसाठी ओटीएस योजनांची अंतिम तारीख वाढवण्याची शक्यता असून गोल्ड लोन योजना पुन्हा सुरू करण्याचे ठरवण्यात आले आहे.
सहकारी बँक क्रेडिट सोसायटीच्या संचालकांशी श्री. गावडे यांनी बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. ते म्हणाले की कर्जफेडीसाठी एकरकमी योजनांची (ओटीएस) मुदत मार्च 2020 मध्ये संपुष्टात आली नसून तिचा लाभ अनेक कर्जदारांना घेता आला नाही. कोरोनाचे सावट असल्यामुळे त्याचा फायदा मिळाला नाही म्हणून त्या योजनेची मुदत वाढवणे आवश्यक आहे. ती किती असावी हे ठरवून त्याप्रमाणे मुदतवाढ करण्यात येणार असल्याचे श्री. गावडे यांनी सांगितले. गोल्ड लोन योजना सहकारी बँक/सोसायटय़ांसाठी बंद करण्यात आली होती. ती पुन्हा सुरू करण्यासाठी हिरवा सिग्नल देण्यात आल्याचे गावडे यांनी सांगितले.
ऊस उत्पादक शेतकऱयांनी दुसरे पीक घ्यावे, अशी सूचना श्री. गावडे यांनी केली. त्यांनी पुढे सांगितले की गोवा डेअरीचा कारभार योग्य त्या माणसांकडे सोपवण्यात आला आहे. ते डेअरी मार्गावर आणतील अशी आशा त्यांनी वर्तवली. शेतकऱयांना सरकार योग्य तो आधार देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.









