प्रतिनिधी/ मडगाव
मडगावात कोविड-19 चे रुग्ण वाढल्याने आणि त्यातच मोती डोंगर येथील झोपडपट्टीत रुग्ण वाढू लागल्याने मडगाव पालिकेने खबरदारीचे उपाय हाती घेताना अत्यावश्यक कामे सोडून अन्य नागरिकांना पालिकेत प्रवेश देणे बंद केले आहे. पालिकेत जन्म व मृत्यूचे दाखले तसेच परवाने नूतनीकरण, घरपट्टी व अन्य करांचा भरणा अशा सेवा मागील अडीच महिन्यांपासून खिडक्मया खुल्या ठेवून दिल्या जात होत्या. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी ही उपाययोजना राबविण्यात आली होती.
पालिकेत प्रशासकीय, तांत्रिक, कर, सेनिटरी, लेखा असे विभाग असून अशा ठिकाणी भेट घेण्यास येणाऱया नागरिकांचे थर्मल गनने तापमान तपासून आणि हात सेनिटायजरने निर्जंतुक करूनच त्यांना आत प्रवेश देण्यात येत होता. मात्र सोमवारपासून हे निर्बंध कडक करण्यात आले असल्याचे दिसून आले. नागरिकांना अतिमहत्त्वाची कामे असल्यासच प्रवेश देण्यात येऊ लागला आहे.
फैलावामुळे खबरदारी : नगराध्यक्षा
यासंदर्भात नगराध्यक्षा पूजा नाईक यांच्याशी विचारणा केली असता पालिकेच्या विविध क्षेत्रांतून नागरिक कामासाठी पालिकेला भेट देत असतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सध्या कोविडचा फैलाव पालिका क्षेत्रात झालेला असून आता विशेष करून मोती डोंगर भागात रुग्ण आढळू लागल्याने खबरदारीचे उपाय हाती घ्यावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अतिमहत्त्वाचे काम असल्यास नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तळमजल्यावर तीन टेबले टाकून सोय करण्यात आली असून पहिल्या मजल्यावर तर प्रवेशबंदीच करण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्षा नाईक यांनी दिली.









