डोनाल्ड ट्रम्प अन् नितीश कुमार यांच्यासाठी केले होते काम
वृत्तसंस्था / लखनौ
संयुक्त जनता दलाचे सरचिटणीस के.सी. त्यागी यांचे पुत्र अमरीश त्यागी यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा आणि भाजपचे वरिष्ठ नेते लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी लखनौमध्ये अमरिश यांना भाजपचे सदस्यत्व प्रदान केले. अमरिश यांनी यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेचे व्यवस्थापन पाहिले आहे. माझ्या कुटुंबात लोकशाहीवादी व्यवस्था असल्याने मी कुठल्याही पक्षात सामील होण्यास स्वतंत्र असल्याचे अमरिश यांनी म्हटले आहे.
माझे वडिल के.सी. त्यागी हे रालोआच्या घटक पक्षाचे नेते आहेत. अशा स्थितीत भाजपसोबत नेहमीच माझी जवळीक राहिली आहे. वडिलांची समाजवादी विचारसरणी आणि भाजपचे हिंदुत्व वेगळे असू शकते. भाजपचे कार्य, पंतप्रधान मोदी आणि योगींच्या नेतृत्वाने पक्षप्रवेशाची पेरणा दिल्याचे अमरिश यांनी म्हटले.
भाजपची प्रचारमोहीम सर्वात आघाडीवर आहे. भाजपच्या तुलनेत विरोधी पक्ष खूपच मागे पडले आहेत. भाजपकडून दिली जाणारी जबाबदारी मी पार पाडणार असून याहून वेगळी अपेक्षा बाळगली नसल्याचे अमरिश यांनी नमूद केले.
43 वर्षीय राजकीय रणनीतिकार अमरिश त्यागी हे ओवलीनो बिझनेस इंटेलिजेन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ओबीआय कंपनी राजकीय पक्षांसाठी निवडणूक व्यूहनीति, माध्यम व्यवस्थापन आणि राजकीय सल्ला देण्याचे काम करते. या कंपनीने नितीश कुमार यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत काम केले होते. तर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक व्यूहनीतिवर काम केले होते. अमेरिश यांच्या कंपनीला अमेरिकेतील आशियाई समुदायांच्या मागण्या, अपेक्षा, आशंकांचे आकलन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
अन्य राजकीय पक्षांमध्ये कुटुंबाचा अर्थ केवळ नातलग असा होतो. तर भाजपचा परिवार प्रत्येक जात आणि समुदायाशी निगडित आहे. विरोधकांकडे राष्ट्रीय किंवा प्रादेशिक स्तरावर कुठलाच मुद्दा नसल्याचे जातीच्या नावावर राजकारण केले जातेय. मोठय़ा स्तरावर नेते भाजपशी जोडले जात असल्याचा दावा उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केला.









