एक आठवडय़ात रुग्णांमध्ये 60 टक्क्यांची वाढ
वृत्तसंस्था/ पॅरिस
ओमिक्रॉन संक्रमणाच्या वाढत्या रुग्णांदरम्यान फ्रान्सने स्वतःच्या 1 कोटी नागरिकांना बूस्टर डोस दिला आहे. फ्रान्सचे आरोग्यमंत्री ओलिवियर वेरन यांनी सोशल मीडियावर यासंबंधीची माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार फ्रान्समध्ये आतापर्यंत 5.20 कोटी लोकांना लसीचा एक डोस मिळाला आहे. फ्रान्सने फायजर/बायोएनटेक, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन आणि ऍस्ट्राझेनेकच्या लसीला मंजुरी दिली आहे.
तर फ्रान्समध्ये दिवसभरात 51,624 नवे रुग्ण आढळून आले आहेत. येथे एका आठवडय़ात कोरोनारुग्णांमध्ये सुमारे 60 टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. आरोग्य मंत्री सोमवारी महत्त्वाची बैठक घेणार असून यात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी अतिरिक्त उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे.
नवा कोरोना व्हेरियंट ओमिक्रॉन आतापर्यंत जगातील 38 देशांमध्ये पोहोचला आहे. पण दिलासा देणारी बाब म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनुसार दोन आठवडय़ांमध्ये आतापर्यंत कुठल्याही देशात या व्हेरियंटने संक्रमित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही.
अत्यंत अधिक म्युटेशन असलेला हा कोविड-19 स्ट्रेन किती धोकादायक आहे याची योग्य माहिती मिळण्यास अद्याप अनेक आठवडे लागतील. तसेच लसीच्या विरोधात हा स्ट्रेन कसा प्रभाव दाखवतोय हे देखील काही काळानंतर स्पष्ट होणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून म्हटले गेले.









