अध्याय बारावा
संतसंगतीने माणसाची चित्तशुद्धी कशी होते ते आपण बघितले पण संतसंगती कायम मिळेलच असे नाही अशावेळी आणखी एक मार्ग म्हणजे वेद उपनिषदावर आधारीत संतांच्या साहित्याचा अभ्यास करायचा आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागायचं. त्यामध्ये व्यवहारिक जगात कोणत्या प्रसंगी कसं वागायचं याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलेलं असतं. तसं करताना काहीवेळा आपण करतोय ते बरोबर का चूक हा विचार मनात आल्यास तो झटकून टाकायचा आणि पुढं जायचं कारण संत हे ईश्वराचं सगुण रूप असल्याने ते सांगतात ते पूर्णपणे बरोबरच असते आणि आपल्या हिताचे असते. त्यामुळे त्यानुसार वागत गेल्यास जे घडेल ते आपल्या हिताचंच आहे अशी खात्री बाळगावी. जीवनात आपण योजलंय तसं घडेल की नाही याबद्दल आपल्याला सदैव चिंता लागून राहिलेली असते. संत आपल्याला चिंतामुक्त करतात. ते सांगतात, आयुष्याचा जीवनक्रम पूर्वनियोजित असून तो हिताचा असतो म्हणून तू काळजी करायचं एकदम बंद कर. काल काय घडलंय त्यावर विचार करू नकोस. उद्या काय होईल म्हणून काळजी करू नकोस. सदैव ईश्वर स्मरणात राहून ते जशी प्रेरणा देतील त्यानुसार वाग आणि जे घडेल ते तुझ्या हिताचं आहे अशी खात्री बाळग. आता या क्षणी घडलेली गोष्ट कदाचित तुला आवडली नसेल तरी कालांतराने घडलेली गोष्टच हिताची आहे हे लक्षात येईल म्हणून कधीही सत्संग सोडू नये. श्रीगोंदवलेकर महाराज याबाबतीत फार मार्मिक उदाहरण देतात ते म्हणतात रेल्वेत बसलेले, अगदी बिन तिकिटाचे, भिकारीसुद्धा शेवटपर्यंत जातात फक्त त्यांनी रेल्वे सोडायची नाही. तसेच आपण संकटाच्या किंवा विपरीत परिस्थितीतही संतांच्या उपदेशानुसार वागल्यास आपलं भलं निश्चित होणार आहे ही खात्री बाळगावी व त्यानुसार वर्तन करावे.
या सर्व पार्श्वभूमीवर आपण भगवंत उद्धवाला काय सांगत आहेत त्याचा अभ्यास करू. ते म्हणाले, कर्मकांडे करून अहंकारी होण्यापेक्षा सतसंगती केव्हाही उत्तम जड, मूढ अशा रजतमयोनीमध्ये जन्मास आलेले असूनसुद्धा दृढ सत्संगतीला लागलेले माझ्या ठिकाणी स्थिर होऊन राहिले. पुण्याच्या बळाने सत्संगती प्राप्त झाली की, अनंत सुखे भोगता येतात, देवाधिदेव त्यांना वंदन करतात आणि शंकर इत्यादिकही त्यांच्या भेटीला येतात. यमधर्म त्यांच्या चरणी लागतात व तीर्थे त्यांचे चरणतीर्थ मागतात. भक्तीभावाने सत्संगती धरली असता एवढा लाभ होतो. दैत्य, राक्षस व अंत्यज तरले एवढेच काय, अरे, त्या त्या युगात त्या त्या ठिकाणी आणखीही कित्येकांचा उद्धार झालेला आहे. इतर अनेकजणसुद्धा सत्संगाच्या प्रभावानेच मला प्राप्त करू शकले तुला एकेक उदाहरणंच सांगतो ऐक, वृत्रासुर इंद्राशी युद्ध करीत होता, त्याचे वर्णन वेदांनीसुद्धा केलेले आहे. युद्धात देखील त्याची बुद्धी विषमभावरहित होती म्हणून तो माझ्या पदाला येऊन पोहचला. नारदाच्या गोष्टी ऐकताच ज्याने गर्भातच मला मिठी घातली, तो भक्तराजशिरोमणि प्रल्हाद कयाधूच्या पोटी जन्मास आला होता. महापराक्रमी वृषपर्वा दैत्य माझ्या पदामध्ये लीन झाला. बळीच्या दारात भिक्षा मागण्याकरिता मी बटु वामन झालो कपटाने बळीला बद्ध केले असता माझा म्हणजे छळणाऱयाचाच उलट छळ झाला. माझ्याकडेच द्वारपाळाचे काम आले आणि मीच बळीचा ताबेदार झालो. त्या बळीचा पुत्र बाणासुर, तो शिवाच्या वरप्रसादाने फार मत्त झाला होता. त्याने माझा नातूच (प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध ) चोरून नेला ! तो चोर बाणासुर मी युक्तीने धरला आणि त्याला बाणाने अत्यंत जर्जर केला. त्याच्या सहस्रभुजांचा भार तोडून टाकला. शंकराने मध्ये येऊन त्याला जिवानिशी मात्र मारू दिले नाही. तो म्हणाला, “आपल्या भक्ताचा पुत्र मारशील हो !’’ मलाही बळीची मोठी भीड पडली म्हणून मी अखंड त्याच्या द्वारात असतो, ह्यासाठी बाणालाही मी उद्धरले.
ही यादी बरीच मोठी आहे सविस्तर पाहुयात पुढील भागात..
क्रमशः







