पाक पहिला डाव सर्वबाद 286, तैजूल इस्लामचे 7 बळी, बांगलादेश दु. डाव 4 बाद 39
वृत्त संस्था/ चित्तगाँग
यजमान बांगलादेश-पाकिस्तान यांच्यात येथे सुरू असलेली पहिली कसोटी रविवारी खेळाच्या तिसऱया दिवशी रंगतदार स्थितीत पोहचली आहे. या सामन्यात यजमान बांगलादेशने पहिल्या डावात पाकवर 44 धावांची आघाडी घेतल्यानंतर त्यांची दुसऱया डावात स्थिती 4 बाद 39 अशी केविलवाणी झाली. बांगलादेशकडे आता एकूण 83 धावांची आघाडी आहे.
या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 330 धावा जमविल्या. पाकने बिनबाद 145 या या धावसंख्येवरून तिसऱया दिवसाच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि बांगलादेश गोलंदाज तैजूल इस्लाम याच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकचा डाव 286 धावांत आटोपला.
पाकचा सलामीचा फलंदाज अबीद अलीने 282 चेंडूत 2 षटकार आणि 12 चौकारांसह 133 धावा झळकविल्या. अब्दुल शफीकने 166 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 52 धावांचे योगदान दिले. या सलामीच्या जोडीने 145 धावांची भागीदारी केली. ही सलामीची जोडी फुटल्यानंतर पाकचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. अझहर अलीला खातेही उघडता आले नाही. कर्णधार बाबर आझमने 10, फवाद आलमने 8 तर मोहम्मद रिझवानने 5 धावा जमविल्या.
फईम अश्रफने 80 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 38, हसन अलीने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 12 तर शाहीन आफ्रिदीने 2 चौकारांसह नाबाद 13 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे इस्लामने 116 धावांत 7 तर हुसेनने 47 धावांत 2 आणि मेहदी हसन मिराजने 68 धावांत 1 गडी बाद केला.
खेळाच्या पहिल्या सत्रात बांगलादेशच्या तैजूल इस्लामने अब्दुला शफीक आणि अझहर अली यांना पाठोपाठ बाद केले. त्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि फवाद आलम यांचे बळी मिळविल्याने पाकची उपाहारापर्यंतची स्थिती 4 बाद 203 अशी होती. उपाहारानंतर अबीद अली आणि मोहम्मद रिझवान हे पाठोपाठ बाद झाल्याने 94 षटकाअखेर पाकने 6 बाद 217 धावापर्यंत मजल मारली. फईम अश्रफच्या 38 धावांच्या खेळीमुळे पाकला 286 धावापर्यंत मजल मारता आली.
44 धावांची आघाडी घेतल्यानंतर बांगलादेशने आपल्या दुसऱया डावाला सुरूव्वात केली. पण, शाहीन आफ्रिदीच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशने आपले चार फलंदाज 39 धावांत गमविले. शाहीन आफ्रिदीने डावातील पाचव्या षटकांत सलामीचा फलंदाज शदमन इस्लामला एका धावेवर पायचीत केले. त्यानंतर त्याने बांगलादेशच्या नजमुल हुसेनला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले.
कणर्धार मोमिनूल हक खाते उघडण्यापूर्वी हसन अलीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. सैफ हसनला शाहीन आफ्रिदीने स्वतःच्या गोलंदाजीवर टिपले. त्याने 3 चौकारांसह 18 धावा जमविल्या. दिवसअखेर बांगलादेशने दुसऱया डावात 19 षटकांत 4 बाद 39 धावा जमविल्या. मुश्फिकूर रहीम 12 तर यासीर अली 8 धावांवर खेळत आहे. पाकच्या शाहीन आफ्रिदीने 6 धावांत 3 तर हसन अलीने 19 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश प. डाव- सर्वबाद 330, पाक प. डाव 115.4 षटकात सर्वबाद 286 (अबीद अली 133, अब्दुला शफीक 52, फईम अश्रफ 38, बाबर आझम 10, हसन अली 12, शाहीन आाफ्रिदी नाबाद 13, तैजूल इस्लाम 7-116, हुसेन 2-47, मेहदी हसन 1-68), बांगलादेश दु. डाव- 19 षटकात 4 बाद 39 ( शदमन इस्लाम 1, सैफ हसन 18, नजमूल हुसेन 0, मोमीनूल हक 0, रहीम खेळत आहे 12, यासीर अली खेळत आहे. 8, शाहीन आफ्रिदी 3-6, हशन अली 1-10).









