
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
किटल, फातर्पा येथील श्री शांतादुर्गा किटलकरीण संस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज सोमवार 14 ते 16 असे तीन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे. यादरम्यान भाविकांनी सॅनिटायझरचा वापर करून सामाजिक अंतर राखावे व मास्क प्रदान करावेत, असे आवाहन संस्थान समितीने केले आहे.
हल्ली मंदिराची सर्व स्थरांवर प्रगती झाली आहे. याकामी भाविकांनी सढळहस्ते मदत केली आहे. यंदा नवीन विजयरथाची भर पडली असून हा रथ एका उद्योजकाने देवीला अर्पण केला आहे. यंदाच्या जत्रोत्सवाचे हा विजयरथ खास आकर्षण ठरणार आहे. तसेच पालखी मिरवणूक त्याचबरोबर सिंहरथ, महारथातून देवीची मिरवणूक काढली जाणार आहे. वेगवेगळय़ा दिवशी देवीला वेगवेगळय़ा रथांत विराजमान करण्यात आल्यानंतर मंदिराच्या सभोवताली बँडवादनाच्या तालावर मिरवणूक काढली जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
आज सोमवार 14 रोजी सकाळी यजमानास प्रायश्चित विधी, गणपतीपूजन, प्रार्थना, श्री भूमिपुरुषास लघरूद्र सेवा, श्रींची महापूजा, प्रसाद, रात्री 9.30 वा. श्रीची चांदीच्या पालखीतून मिरवणूक, रात्री 10 वा. श्रीची सिंहरथातून मिरवणूक, आरती, प्रसाद, मंगळवार 15 रोजी सकाळी नवचंडी वाचन, पूर्णाहुती, दुपारी 12.30 वा. श्रींची महापूजा, आरती वगैरे, रात्री 10 वा. श्रींची विजयरथातून मिरवणूक, आरती, प्रसाद वगैरे होतील. बुधवार 16 रोजी श्रींची महापूजा, आरती वगैरे, रात्री 11.30 वा. शिबिकोत्सव, 12 वा. श्रींची महारथातून मिरवणूक होऊन नंतर विधिवत उत्सवाची सांगता होईल. जत्रोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थान समितीचे अध्यक्ष दिलीप नाईक देसाई, चिटणीस विराज राऊत देसाई, खजिनदार महेश देसाई, मुखत्यार संजू देसाई विशेष परिश्रम घेत आहेत.









