टिएमसीचे उमेदवार समिल वळवईकर यांचे आवाहन
प्रतिनिधी /पणजी
मतदारांकडून सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिळालेला प्रतिसाद उत्स्फूर्त होता. आपल्या विजयासाठी अनेक कार्यकर्त्यांनी फार मोठी मेहनत घेतली आहे, त्यामुळे आपण बहुतांश घरोघरी आणि मतदारांशी संपर्क करु शकलो. मतदारांनी येत्या 14 फेब्रुवारी रोजी दोन फुलांचे बटन दाबून कुंभारजुवे मतदारसंघातील बदलावर शिक्कामोर्तब करावे, अशी विनंती आपण मतदारांना करीत आहे, असे तृणमूल काँगेसचे उमेदवार समिल वळवईकर यांनी शनिवारी जाहीर प्रचार संपण्याच्या अगोदर स्थानिक पत्रकार परिषदेत सांगितले.
कुंभारजुवे मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्या ज्या काही कल्पना आहेत, त्या आपण मतदारांसमोर मांडल्या असून मतदारांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद लाभला. बेरोजगारी ही मतदारसंघाची प्रमुख समस्या असल्याने ती सोडविण्यासाठी आपण कसे प्रयत्न करणार, हेसुद्धा आपण मतदारांना स्पष्ट केले. स्थानिक युवक-युवतींना सरकारी, तसेच खासगी नोकऱया मिळवून देण्यासाठी प्रयत्न आपण यापुर्वीच केले होते. माझे सर्व सदेंश मतदारांपर्यंत पोहोचेल आहेत. मतदार आपल्याला बहुमताने विजयी करतील, असा आपल्याला विश्वास असल्याचेही ते म्हणाले.









