वृत्तसंस्था /मुंबई :
जागतिक संकेतांच्या नरमीमुळे स्थानिक शेअरबाजारात गुरूवारी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. बीएसई सेन्सेक्स गुरूवारी 95.09 अंकांनी घसरण नोंदवत 38,990 अंकांवर निर्देशांक बंद झाला तर दुसरीकडे निफ्टी 7.55 अंकांनी घसरून निर्देशांक 11,527 अंकांवर बंद झाला.
गुरूवारी सकाळी शेअरबाजाराची सुरूवात झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भूमिका बजावल्याचे पाहायला मिळाले. या दरम्यान सेन्सेक्स व निफ्टीत व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. बाजाराची सुरूवात घसरणीने झाली तरी नंतर बाजार चढत गेला. सुरूवातीला बीएसई सेन्सेक्स 93 अंकांनी घसरून 38,992 अंकांवर सुरू झाला आणि नंतर 66 अंकांची वाढ दर्शवत 39,152 अंकांपर्यंत व्यवहार करताना दिसला. दरम्यानच्या दिवसभरात बीएसई सेन्सेक्स 12 अंकांनी वाढ दर्शवत 39,098 वर पोहचला तर निफ्टी 13 अंकांनी वाढून 11,548 अंकांवर पोहचला होता.
या कंपन्यांचे समभाग चढले
सेन्सेक्समध्ये गुरूवारी 5.71 टक्के इतकी वाढ टायटनमध्ये दिसून आली. त्यापाठोपाठ 3.35 टक्के टेक महिंद्रा, 2.46 टक्के नेस्ले इंडियात वाढ दिसली. याशिवाय मारूती, टीसीएस, एल अँड टी, टायटन, बजाज ऑटो आणि सन फार्मा यांच्या समभागात तेजी दिसून आली. दुसरीकडे बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि पॉवरग्रिड कॉर्प यांच्या समभागांमध्ये घसरण झाली आहे.
काल बुधवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. 185 अंकांनी मजबुत होत सेन्सेक्स बुधवारी बंद झाला होता. जागतिक स्तरावरील संस्थागत गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक चालू राहिल्याने रिलायन्स इंडस्ट्रिज, महिंद्रा आणि महिंद्रा आणि इन्फोसिस यांच्या समभागांनी तेजी नोंदवली होती. बीएसई सेन्सेक्समध्ये बुधवारी चढ-उताराचा खेळ सुरू होता. दरम्यान भारत-चीन या देशात पुन्हा वातावरण तापल्याने गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगण्याची भूमिका बजावली. दरम्यान स्थानिक बाजारात सुस्तीमुळे अमेरिकी डॉलरच्या मजबुतीने डॉलरच्या तुलनेत रुपया 44 पैशांनी घसरला. रुपया गुरूवारी 73.47 वर बंद झाला.









