पश्चिम घाटातल्या जंगलात सरपटणाऱया प्राण्यांच्या वेगवेगळय़ा प्रजातींचे वास्तव्य असून, विभिन्न प्रकारचे साप, सरडे, पाली यांच्यामुळे इथल्या जैविक संपदेचा वारसा समृद्ध झालेला आहे. सरपटणाऱया प्राण्यात घोरपडीचा प्रामुख्याने समावेश असून आपल्या पायांच्या तीक्ष्ण नखांच्या साहाय्याने ती उभ्या भिंतीवरही सहजपणे चढून जाण्यात यशस्वी ठरलेली आहे. त्यामुळे मराठेशाहीच्या इतिहासात बिकट वाटणाऱया कोंढाण्या किल्ल्यावरती चढून जाण्यासाठी तानाजी मालसुरे यांनी यशवंती घोरपडीच्या कौशल्याचा यथार्थपणे उपयोग करून घेतल्याची लोककथा प्रचलित झालेली आहे. आपल्या चारही पायांना निसर्गदत्त लाभलेल्या नखांद्वारे घोरपड उभ्या असलेल्या भिंतीवरती चढून जात असते. डायनोसरसारख्या प्राण्यांशी साधर्म्य सांगणारी घोरपड पहायला धोकादायक असली तरी प्रत्यक्षात ती सहसा मानवी समाजावरती हल्ला करून जखमी करण्याच्या कृत्यापासून चार हात दूर राहते परंतु सर्वसामान्य माणसांना मात्र आपल्या परिसरात घोरपड वावरत असल्याचे दिसताच भय निर्माण विनाकारण होत असते.
घोरपडीचे शरीर लांब अणि सपाट असून तिची शेपूट शरीराला साजेल अशी लांब असते. आपल्या तोंडात असलेल्या लांब आणि चिकट जिभेद्वरे घोरपड आपल्या भक्ष्याला साध्य करत असते. दगड धोंडय़ांतल्या फटीत, जमिनीतल्या बिळात किंवा कातळांच्या ठायी असलेल्या पोकळीत घोरपडीचे वास्तव्य असते. पक्ष्यांची अंडी, सरडे, पाली, छोटे साप, कोळी यासारख्या प्राण्यांची शिकार करून घोरपड गुजराण करत असते. घोरपडीसारखा चतुष्पाद प्राणी पडक्या घरात किंवा लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी वास्तव्य करण्यास पसंत करत असतो. निसर्गात असलेल्या अन्न साखळीचे दुवे अतूट आणि सुरळीत राहिले तरच आपल्या पर्यावरणाचे संतुलन निर्धोकपणे टिकून राहते. घोरपडीसारखा सरपटणारा प्राणी छोटे साप, सरडे, कोळी यांना भक्ष्य करून त्यांच्या विस्तारणाऱया संख्येवरती नियंत्रण ठेवण्याची कामगिरी शेकडो वर्षांपासून करत असला तरी त्याचे पर्यावरणातले महत्त्व अजूनही आम्हाला उमजलेले नाही आणि त्यामुळे घोरपडीचा वावर आमच्या घराच्या परिसरात असणे धोकादायक वाटते. त्यासाठी घोरपडीला जेरबंद करून लोकवस्तीपासून दूर सोडण्यासाठी आम्ही सतत आग्रही असतो.
घोरपडीसारख्या प्राण्याच्या कातडी, मांस, रक्त आणि फुफ्फुस, आतडय़ांसारख्या अवयवांना भारतीय बाजारपेठेत विशेष मागणी असल्याने त्यांची शिकार मोठय़ा प्रमाणात करण्यात येत असते. घोरपडीला ठार केल्यानंतर तिचे मांस आणि रक्त औषधी गुणधर्मांनी युक्त असल्याचा समज असल्याने त्यांची अव्वाच्या सव्वा किमतीत विक्री केली जाते. तामिळनाडूच्या वनखात्याने पदुकोट्टाई येथील एका गावात घोरपडीच्या रक्ताची विक्री करताना समाज माध्यमावरून प्रसारित होणाऱया व्हीडिओ क्लिपवरून यात गुंतलेल्या गुन्हेगारांना अटक केले होते. घोरपडीचे रक्त दम्यासारख्या आजारातून मुक्तता करते, असा समज असून हे ताजे रक्त प्राशन केले तर शरीराला फायदेशीर ठरते अशी मानसिकता दृढ आहे. औषधी विज्ञानाद्वारे त्याला कोणताच आधार नसताना दमा आणि अन्य आजारांनी ग्रस्त लोक घोरपडीचे रक्त पिण्यात धन्यता मानतात. तेलंगणात तर काही लोक जिवंत घोरपडीला पेटत्या निखाऱयांवरती ठेवून भाजतात आणि अशा क्रूर पद्धतीने शिजलेले मांस खातात.
केरळातल्या काही ठिकाणी मांस आणि रक्तासाठी घोरपडीची शिकार करण्यात गुंतलेले शिकारी असून, मागणी तसा पुरवठा या तंत्राद्वारे ते घोरपडीची विक्री करतात. त्रिची परिसरात घोरपडीची निर्घृणपणे शिकार करण्याच्या व्यवसायात गुंतलेली काही मंडळी असून वनखात्याकडून त्यांना अटक करून तुरुंगात टाकलेले असतानाही शिकारीची प्रकरणे कमी झालेली नाही. आपल्या देशात गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकसारख्या राज्यात घोरपडीची हत्या तिच्या कातडीसाठी शेकडो वर्षांपासून केली जात आहे. भारताबाहेर पापूआन्यू गिनियात घोरपडीच्या कातडीला लोकवाद्यासाठी मोठी मागणी असून तेथे ही घोरपड ‘ड्रम लिजर्ड’ म्हणून लोकमान्य ठरलेली अहे. कुंडू हे लोकवाद्य तेथील लोकमानसात प्रिय ठरलेले आहे. कर्नाटक राज्यातही घोरपडीच्या चामडय़ापासून कंजिरा नावाचे चर्मवाद्य श्रवणीय संगीताच्या निर्मितीसाठी वापरले जाते. गोवा आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरच्या काही गावात गणेश चतुर्थी, शिमग्याच्या उत्सवात आरती, भजन आणि पारंपरिक लोकसंगीताद्वारे लोकगीतांच्या गायनासाठी घुमट वादनाचा वापर केला जातो. घुमट वादनाला गोव्यात शेकडो वर्षांचा इतिहास असून इथल्या हिंदू धर्मियांबरोबर ख्रिस्ती धर्मियांच्या लोकगीतांचे गायन घुमटाच्या तालावरती रंगत जाते. घुमटासारखे चर्मवाद्य मातीच्या मडकीच्या एका मुखावरती घोरपडीचे चामडे आणि दुसरे मुख उघडे ठेवल्याने निर्माण होते. घुमटाप्रमाणेच म्हादळे हे वाद्यसुद्धा घोरपडीच्या चामडय़ानेयुक्त असते.
गणेश चतुर्थीच्या आसपास मोसमी पावसाची रिपरिप कमी झाल्यावरती दगडांच्या पोकळीत किंवा जमिनीतल्या बिळात असलेली घोरपड सकाळच्या कोवळय़ा उन्हाची ऊब घेण्यासाठी बाहेर येत असते. जंगली श्वापदांचा शोध घेण्यात तरबेज असलेल्या कुत्र्यांच्या मदतीने शिकारी अशा घोरपडींना खेचून बाहेर काढतात आणि त्यांना कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने ठार करतात. गोव्यात घोरपडीच्या रक्तास आणि मांसास मागणी असून चामडय़ाचा वापर घुमटासाठी होत असतो. घोरपडीच्या फुफ्फुस आणि आतडय़ांनाही विशेष मागणी असून त्यांच्यापासून जे तेल काढले जाते त्याचा वापर लहान मुलांना परंपरेने मालिश करण्यासाठी केला जातो. या तेलाचा वापर अस्थि रोगांवरती गुणकारी असल्याचे मानले जाते. त्यामुळे गोव्यात त्यांची मोठय़ा प्रमाणात शिकार केली जाते. 29 ऑगस्ट 2020 रोजी फोंडा येथील उपविभागीय वनाधिकारी आनंद जाधव आणि येथील वन परिक्षेत्र अधिकारी दीपक बेतकीकर यांनी आडपई-दुर्भाट येथे उड्डो-केळोशीहून होडीतून जुवारीमार्गे आलेल्या सहा संशयितांना ठार केलेल्या तीन घोरपडी आणि धारदार विळे, फावडा तसेच प्रशिक्षित कुत्र्यांसह अटक करण्यात यश मिळविले. वन्यजीवन संरक्षण कायदा 1972 द्वारे घोरपडीला प्रथम श्रेणीतले संरक्षण दिलेले असताना गोव्यात आणि अन्यत्र त्यांची निर्घृणरित्या शिकार केली जात आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती संवर्धत क्षेत्रात कार्यरत असणाऱया संस्थांच्या संघटनेने घोरपडीचा संकटग्रस्त जंगली श्वापदात समावेश केलेला आहे, याची जाणीव ठेवून त्यांचे संरक्षण महत्त्वाचे आहे.








