जेव्हा पृथ्वीपुत्र नरकासुराने पाहिले की, भगवान श्रीकृष्णांच्या चक्र आणि बाणांनी आपल्या सेनापतींचा संहार झाला आहे, तेव्हा त्याचा क्रोध अनावर झाला. समुद्रातून उत्पन्न झालेल्या व मद पाझरणाऱया उन्मत्त हत्तींची सेना घेऊन तो नगराच्या बाहेर आला. त्याने पाहिले की, सूर्याच्या वर विजेसह पावसाळय़ातील काळा मेघ शोभावा त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आपल्या पत्नीसह आकाशात गरुडावर बसले आहेत. भौमासुराने स्वत: भगवंतांवर शतघ्नी नावाची शक्ती फेकली आणि त्याच्या सगळय़ा सैनिकांनीसुद्धा एकदम त्यांच्यावर आपापली शस्त्रास्त्रे सोडली. भगवान श्रीकृष्ण चित्रविचित्र पंख असणारे तीक्ष्ण बाण नरकासुराच्या सैन्यावर सोडू लागले. त्यामुळे लगेचच भौमासुराच्या सैनिकांचे हात, मांडय़ा, मुंडकी आणि धडे तुटून खाली पडू लागली. हत्ती आणि घोडेसुद्धा मरून पडले. परमाश्चर्य केलें कैसें । अपारदैत्यीं समरावेशें। शस्त्रास्त्रांच्या प्रलयवर्षें। वर्षतां रोषें क्षोभोनी। श्रीकृष्णाच्या करलाघवें। प्रबळ दैत्यसैन्यचि आघवें । छेदूनि विखंड केलीं शवें। जंव भेदावें तच्छस्त्रीं । शस्त्रस्त्रप्रेरक योद्धे रणीं । आधीं खंडूनि पाडिले बाणीं। मग तीं शस्त्रास्त्रे छेदूनी। पाडिलीं धरणीं कौतुक हें । अपारदैत्यांची शस्त्रवृष्टि। एकलें शार्ङ्ग कृष्णमुष्टी। एकैक शस्त्र तीं तीं कांठीं। छेदूनि भूतटीं पाडियलीं । परम तीक्ष्ण मार्गणधारा। जवें वर्षतां शार्ङ्गधरा । तीं तीं बाणीं एकैक शस्त्रा। छेदूनि धुळोरा उधळिला। सुपर्ण म्हणिजेतो खगेंद्र। कृष्ण वाहता चपळतर। समरिं भ्रमरी देतां चतुर। वारणभार विध्वंसी। भौमासुराच्या सैनिकांनी भगवंतांवर जी जी शस्त्रास्त्रे चालविली होती, त्यांपैकी प्रत्येक, भगवंतांनी तीन तीन तीक्ष्ण बाणांनी तोडून टाकली. त्यावेळी श्रीकृष्ण ज्या गरुडावर बसले होते, तो आपल्या पंखांनी हत्तींना मारीत होता. तसेच चोचीने आणि नखांनी त्याने हत्तींना घायाळ केले, तेव्हा ते घाबरून रणांगण सोडून नगरामध्येच घुसले. तेथे आता एकटा भौमासुर लढत राहिला. गरुडाच्या माराने घायाळ होऊन आपली सेना पळून जाऊ लागलेली पाहून त्याने त्याच्यावर वज्रालासुद्धा निष्प्रभ्र करणारी शक्ती फेकली. परंतु तिच्या माराने गरुड जरासुद्धा विचलित झाला नाही. फुलांच्या माळेच्या प्रहाराने हत्ती विचलित होऊ नये तसा. शूळप्रेरणापूर्वींच कृष्णें। क्षुरपर्वें सुदर्शनें। गजस्था नरकासुराचें यत्नें। शिर छेदून उडविलें । बालार्ककोटिप्रभाभासुर । सुदर्शनचक्र सहस्रार। क्षुरपर्वतीकृष्णधार । लागतां प्रहार तयाचा । सर्व प्रयत्न निष्फळ झालेले पाहून त्याने श्रीकृष्णांना मारण्यासाठी हातात त्रिशूळ घेतला. परंतु तो त्याने फेकण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी तीक्ष्ण धारेच्या चक्राने हत्तीवर बसलेल्या भौमासुराचे मस्तक उडविले.दिव्यकुण्डलकिरीटवंत। नरकासुराचा मस्तक पतित। भूमंडळीं उज्वळित। देखती दैत्यअनुयायी। हाहाकार करिती असुर। म्हणती संपला भौमासुर। शेष यूथप पलायनपर। रडती किंकर सभोंवते । निर्जर करिती पुष्पवृष्टि। साधु म्हणती सुखसंतुष्टि। आशीर्वादप्रणितमुष्टि । मंत्राक्षतांच्या मुनिहस्तें । त्याचे कुंडले आणि सुंदर किरीटाने झगमगणारे मस्तक जमिनीवर पडले. ते पाहून भौमासुराचे संबंधी ‘हाय हाय’ करू लागले. ऋषी ‘वाहवा! वाहवा!’ म्हणू लागले.
ऍड. देवदत्त परुळेकर








