उद्यापासून बससेवा सुरू होणार : मात्र अद्याप अधिकृत आदेश नाही
प्रतिनिधी/ निपाणी
कोरोना व लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून निपाणीतून आंतरराज्य बससेवा ठप्प आहे. मात्र आता सरकारने अनलॉक संदर्भात नियमावली जारी केल्याने 22 सप्टेंबरपासून कर्नाटकातून महाराष्ट्रात बससेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी निपाणी आगार सज्ज झाले आहे. असे असले तरी आंतरराज्य बससेवेच्या नियमावली संदर्भात अद्याप अधिकृत निर्देश आलेले नाहीत.
सीमाभागातील प्रमुख आगार म्हणून निपाणीची ओळख आहे. निपाणी आगाराचे सुमारे 60 टक्के उत्पन्न महाराष्ट्रात होणाऱया बससेवेवर अवलंबून होते. मात्र 22 मार्चपासून कोरोनाचा वाढता फैलाव व लॉकडाऊनमुळे निपाणीतून महाराष्ट्रात होणारी बससेवा बंद ठेवण्यात आली होती. याचा परिणाम म्हणून अनेक विद्यार्थी, कर्मचारी व प्रवाशांची गैरसोय झाली आहे. त्याचबरोबर निपाणी आगारालाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. दररोज 10 ते 12 लाख रुपये उत्पन्नात खेळणाऱया निपाणी आगाराला सध्या दोन ते अडीच लाखांवर समाधान मानावे लागत आहे.
आंतरराज्य बससेवा ठप्प असल्याने निपाणी आगाराला अधिक फटका बसला आहे. मात्र आता केएसआरटीसीने कर्नाटकातून महाराष्ट्रात बससेवा 22 सप्टेंबरपासून सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आंतरराज्य सीमा खुल्या झाल्या असल्या तरी अद्याप बससेवा बंद होती. त्यामुळे प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने निपाणी-कोल्हापूर असा प्रवास करावा लागत होता. मात्र आता निपाणी आगारातर्पे मंगळवारपासून आंतरराज्य बससेवा सुरू केली जाणार आहे. असे असले तरी या बससेवेसाठी अद्याप मार्गदर्शक नियमावली जाहीर झालेली नाही. त्यामुळे संभ्रमावस्था आहे.
अधिकृत नियमावली लवकरच
याबाबत बोलताना आगार व्यवस्थापक मंजुनाथ हडपद म्हणाले, निपाणीतून महाराष्ट्रात सुमारे 58 मार्गांवर बससेवा सुरू होती. मात्र लॉकडाऊनमुळे ही बससेवा ठप्प झाली आहे. आता 22 सप्टेंबरपासून बससेवा सुरू करण्याचे नियोजन असले तरी यासंदर्भात अद्याप मार्गदर्शक नियमावली आलेली नाही. ती आल्यानंतर बससेवा मंगळवारपासून सुरू होईल. सध्या पहिल्या टप्प्यात 20 मार्गांवर बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बससेवा वाढविण्यात येतील, असे सांगितले.
अथणी, कागवाड तालुक्यात समाधान
उगारखुर्द : कर्नाटकातून महाराष्ट्रात मंगळवारपासून बससेवा सुरू होत आहेत. त्यामुळे अथणी व कागवाड तालुक्यातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव, बागलकोट, विजापूर आदी जिल्हय़ातून पर्यटन, औषधोपचार, शिक्षण, व्यापार, नोकरी आदी विविध कारणांसाठी दररोज हजारो प्रवासी महाराष्ट्रात जात असतात. मात्र गेल्या सहा महिन्यापासून बससेवा बंद असल्याने त्याचा फटका या प्रवाशांना बसला होता. त्यामुळे आता ही बससेवा सुरू होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.









