प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या दीड महिन्यापासून राज्यात हिजाबवरून वादंग उटले होते. त्याबाबत मंगळवारी उच्च न्यायालयाने निकाल देताना हिजाब ही मुस्लीम धर्माची अनिवार्य प्रथा नसल्याचे म्हटले आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक महाविद्यालयांना पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. सुदैवाने कोणत्याच शाळा-महाविद्यालयांमध्ये निकालाचे पडसाद उमटले नाहीत.
‘हिजाब’च्या मुद्दय़ावरून गेल्या महिन्यात शहरातील शाळा-महाविद्यालयांतील वातावरण बिघडले होते. त्यामुळे सततच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाबवर अंतिम निकाल देण्यात आला.
कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शहरासह जिल्हय़ातील महाविद्यालय परिसरात 144 कलमान्वये जमावबंदीचे आदेश बजावण्यात आले होते.
बहुतेक महाविद्यालयांमधील वातावरण नेहमीप्रमाणे शांततामय होते. पण पोलीस बंदोबस्तामुळे दहशतीचे वातावरण होते. काही महाविद्यालयांसमोर पोलीस थांबवून पोलीस खात्याने अनुचित घटना टाळण्याचा प्रयत्न केला. तोंडावर परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांनीही न्यायालयीन निवाडय़ाच्या वादात न पडता दुर्लक्ष केल्याचे जाणवत होते.









