हिरेबागेवाडी पोलिसांची कारवाई : 15 लाखाचा ऐवज जप्त : तीन ठिकाणी चोरी केल्याची कबुली
प्रतिनिधी /बेळगाव
चोरीप्रकरणी तारिहाळ (ता. बेळगाव) येथील चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. मारिहाळ पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून 14 लाख 69 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, ग्रामीण विभागाचे एसीपी गणपती गुडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.
या चौकडीने हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात एक व मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात दोन चोऱया केल्याची कबुली दिली आहे. नागेंद्र उर्फ स्वामी तिप्पाण्णा कोळीकोप्प (वय 23), जोतिबा उर्फ अंजू उर्फ अजय आप्पय्या तिप्पाई (वय 27), महेश प्रकाश खनगावकर (वय 21), मंजुनाथ आप्पय्या कोलेकर (वय 21, चौघेही रा. तारिहाळ) अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत. सोमवारी त्यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी 14 लाख 69 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, गृहोपयोगी वस्तू, तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक बी. आर. मुत्नाळ, वाय. बी. हत्तरवाट, अरुण कांबळे, एस. एस. भांवी, जे. ए. पाटील, आर. एस. केळगीनमनी, एम. एस. मंटूर, एस. एम. अळ्ळळ्ळी, एस. एस. जगजंपी, ए. एच. अगशीमनी व तांत्रिक विभागाचे रमेश अक्की आदींनी या कारवाईत भाग घेतला. पोलीस आयुक्तांनी या पथकाचे कौतुक केले आहे.
नागेंद्र हाच प्रमुख सूत्रधार…
नागेंद्र उर्फ स्वामी कोळीकोप्प हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून वेगवेगळय़ा गावात फिरून कुठल्या घरात चोरी करायची याचा निर्णय तो स्वतः घ्यायचा. प्रत्यक्षात चोरीसाठी मात्र तो जात नव्हता. साथीदारांना पाठवून घरफोडी करायला लावायचा. पोलिसांना सापडू नये, याची पुरेपूर काळजी घेऊन टोळी गुन्हे करायची. मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी या टोळीची माहिती मिळवून त्यांच्या मुसक्मया आवळल्या आहेत.









