शाहूनगर येथील घटना
बेळगाव : पोहोण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून रात्री उशिरा अग्निशमन दलाच्या जवानाच्या मदतीने त्या मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
विजय बसवराज लमाणी (वय 12, रा. संगम कॉलनी, शाहूनगर) असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. तो मूळचा ओबळापूर तांडा, (ता. रामदुर्ग) येथील राहणारा होता. संगमेश्वरनगर येथील सरकारी मुलांच्या शाळेतील तो विद्यार्थी होता. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी 2 ते 3 यावेळेत ही घटना घडली आहे. विजय हा चुलत भावासमवेत शाहूनगरजवळील तलावात अंघोळीसाठी गेला होता. पाण्याची खोली किती आहे याचा अंदाज घेण्याआधीच तो पाण्यात उतरला. चिखलात पाय रुतून तो बुडाला.
ही घटना घडली त्यावेळी त्याचा चुलत भाऊ तेथेच होता. तो घाबरल्यामुळे त्याने कुटुंबीयांना उशिरा याची माहिती दिली. रात्री उशिरा त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. शुक्रवारी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे.









