पालकमंत्र्यांची पोलीस अधिकाऱयांना विकास आढावा बैठकीत सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावात मटका, जुगार व अमलीपदार्थांचा व्यवसाय फोफावतो आहे. जिल्हय़ातही हे गैरधंदे सुरू आहेत. पोलीस अधिकाऱयांनी या गैरधंद्यांवर त्वरित आळा घालावा, अशी सूचना पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी पोलीस अधिकाऱयांना केली. शुक्रवारी सकाळी सुवर्ण विधानसौधमध्ये झालेल्या त्रैमासिक विकास आढावा बैठकीत ही सूचना करण्यात आली.
पालकमंत्र्यांनी यासाठी पोलीस दलाला आठ दिवसांची मुदतही दिली आहे. या आठ दिवसांत विशेष मोहीम राबवून गैरधंदे थोपवावेत. जर मटका, जुगार, गांजा विक्रीवर आळा घालण्यास अपयश आले तर संबंधित पोलीस अधिकाऱयांवर कारवाई करा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. विकास आढावा बैठकीत झालेल्या या चर्चेमुळे पोलीस दलातही खळबळ माजली आहे.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी आदी वरिष्ट अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. आपण यासंबंधी अधिकाऱयांना सूचना केल्या आहेत. मटका, जुगाराविरुद्ध कारवाईची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत गैरधंदे खपवून घेतले जाणार नाहीत. यासंबंधी पोलीस अधिकाऱयांना सूचना करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.
पोलीस आयुक्तांना आणखी कडक भूमिका घ्यावी लागणार
बेळगाव शहर व उपनगरांत मोठय़ा प्रमाणात मटका, जुगार सुरू आहे. अनेक अड्डे पोलिसांच्या मदतीनेच सुरू आहेत. डॉ. एम. बी. बोरलिंगय्या हे रुजू होण्यापूर्वी जुगारी अड्डे चालकांना काही पोलीस व अधिकाऱयांनी खुली सूटच दिली होती. याची माहिती मिळाल्यामुळे पोलीस आयुक्तांनी आपल्या अधिकाऱयांना सक्त ताकीद दिली असून आता या विषयावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतही चर्चा झाल्याने पोलीस आयुक्तांना आणखी कडक भूमिका घ्यावी लागणार आहे.









