प्रतिनिधी/ बेळगाव
50 वर्षांपूर्वी लावलेल्या शारदोत्सवाच्या रोपाचा आज डेरेदार वृक्ष झाला आहे. हा वृक्ष असाच विस्तारत राहील, अशा शुभेच्छा शारदोत्सवाच्या माजी अध्यक्षा निर्मला जोगळेकर यांनी दिल्या.
शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे ऑनलाईन पद्धतीने सृजनशील लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून गुरुवारी दुपारी निर्मला जोगळेकर यांनी पुण्याहून ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. यावेळी त्यांनी या शुभेच्छा दिल्या व कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद लाभला असून ती यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यानंतर शारदोत्सव सोसायटीच्या अध्यक्षा व लेखिका माधुरी शानभाग यांनी कथा लेखन व ललित लेखन या विषयावर विवेचन केले. सहभागी महिलांनी या कार्यशाळेत काही प्रात्यक्षिकेही करणे अपेक्षित असून त्यासाठी त्यांनी महिलांना ‘एक अविस्मरणीय दिवस’ व ‘कोविड योद्धा’ असे दोन विषय लेखनासाठी दिले आहेत. शुक्रवारी कार्यशाळेत मार्गदर्शन करणाऱया लेखिका संध्या देशपांडे यांनी महिलांना दोन गोष्टी दिल्या असून नाटय़रुपांतर करावयाचे आहे. तर मंथनच्या अध्यक्षा शोभा लोकूर या प्रासंगिक काव्य लेखन या विषयावर मार्गदर्शन करणार असून त्यांनीही दोन विषय दिले आहेत. त्यावर काव्य लेखन करावयाचे आहे.
कार्यशाळेत बीजभाषण करताना माधुरी शानभाग म्हणाल्या, चित्रकला, संगीतकला यासाठी गुरुची आवश्यकता आहे. पण लेखन कला ही व्यक्तीला स्वतःच विकसित करावी लागते. त्यासाठी शब्दावर हुकुमत, वाचनाची आवड असणे आवश्यक आहे.
लेखनाचा एकूण प्रवास हा व्यक्तीने स्वतः करावयाचा आहे. यानंतर त्यांनी ललित व कथा लेखन कोणत्या पद्धतीने करावे, यासाठी अभ्यास कसा करावा? याचे सविस्तर विवेचन केले. सूत्रसंचालन अरुणा नाईक यांनी केले. या कार्यशाळेसाठी शारदोत्सव कार्यकारिणीतील कीर्ती दोड्डण्णावर यांचे सहकार्य लाभले. प्रारंभी माजी अध्यक्षा देवयानी देशपांडे, ललिता मुतकेकर व लता साठे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.









