डीवायएसपी लक्ष्मी यांचा मृतदेह मित्राच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत
प्रतिनिधी/ बेंगळूर
सीआयडीच्या डीवायएसपी व्ही. लक्ष्मी (वय 33) यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह गुरुवारी बेंगळूरमधील मित्राच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्यांच्या मित्रांनी लक्ष्मी यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. तर आपली मुलगी आत्महत्या करेल अशा मनःस्थितीची नव्हती, असे लक्ष्मी यांच्या वडिलांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाविषयी गुढ निर्माण झाले असून गृहमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
डीवायएसपी लक्ष्मी बेंगळूरच्या कोनणकुंटे येथे वास्तव्यास होत्या. बुधवारी सायंकाळी त्या नागरभावी येथील आपल्या मित्राच्या घरी पार्टीसाठी गेल्या होत्या. पार्टी करून भोजन आटोपल्यानंतर त्या तेथेच झोपी जाण्यासाठी खोलीत गेल्या. मात्र, गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्यांनी तणावामुळे आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज असून याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.
मुळच्या कोलार जिल्हय़ाच्या मालूर तालुक्यातील असणाऱया लक्ष्मी या 2014 च्या बॅचच्या पोलीस अधिकारी होत्या. प्रशिक्षणानंतर 2017 मध्ये ते सीआयडी पोलीस विभागात सेवेत दाखल झाल्या. पोलीस सेवेत दाखल होण्यापूर्वी 2012 मध्ये त्यांनी नवीन या युवकाशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर त्या पतीसमवेत कोणनकुंटे येथे वास्तव्यास होत्या. अमेझॉन कंपनीत असणारा नवीन नोकरीनिमित्त हैदराबाद येथे वास्तव्यास होता. मागील दोन वर्षांपासून या दाम्पत्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळेच लक्ष्मी यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे.
तीन दिवसांपूर्वी लक्ष्मी आपल्या पतीसमवेत नागरभावी येथील मित्राच्या घरी आल्या होत्या. त्यानंतर दुसऱयाच दिवशी नवीन हैदराबादला निघून गेला. त्यानंतर लक्ष्मी यांनी बुधवारी रात्री पार्टी केली. त्यानंतर रुममध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, कोणत्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. लक्ष्मी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी व्हिक्टोरिया इस्पितळाकडे पाठविण्यात आला आहे. मानसिकदृष्टय़ा तणावाखाली असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले असले तरी त्यांच्या मृत्यूचे गुढ अद्याप उकलले नाही. अन्नपुर्णेश्वरीनगर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
मित्रांवर संशय
आपल्या मुलीसमवेत बुधवारी रात्री पार्टी केलेल्या मनोहर आणि प्रज्ज्वल यांच्यावर लक्ष्मी यांचे वडील वेंकटेश यांनी संशय व्यक्त केला आहे. मनोहर हा बेंगळूर महापालिकेचा कंत्राटदार आहे. आपल्या मुलीकडे अधिकार, पैसा, मालमत्ता आहे. त्यामुळे मानसिकदृष्टय़ा खचून आत्महत्या करण्यापर्यंत तिची मजल जाऊच शकत नाही, असे वेंकटेश यांनी सांगितले आहे. लक्ष्मी यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी वेंकटेश यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मनोहर उर्फ मनू, प्रज्ज्वलसह चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात भा. दं. वि. 174 (3) अंतर्गत गुन्हा
गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
डीवायएसपी लक्ष्मी यांच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी पोलीस अधिकाऱयांना दिले आहेत. हावेरी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पोलीस अधिकारी लक्ष्मी यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपास केल्यानंतरच सत्यासत्यता उघडकीस येईल. पोलीस खात्यातील कर्मचाऱयांचे मनोबल उंचावण्यासाठी निरंतरपणे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.









