85 गाळय़ांसाठी 9 ते 22 ऑक्टोबरदरम्यान महालिलाव
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळय़ांच्या माध्यमातून महसूल मिळतो. पण शहरातील गाळय़ांच्या कराराची मुदत संपुष्टात आल्याने ते नव्याने भाडे कराराने देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 85 गाळे भाडे कराराने देण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला आहे. खंजर गल्लीतील लक्ष्मी मार्केटमधील गाळेदेखील भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या मालकीचे व्यापारी संकुल असून 440 गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. मात्र काही गाळय़ांच्या कराराची मुदत यापूर्वीच संपुष्टात आली आहे. काही ठिकाणी नव्याने गाळय़ांची उभारणी करण्यात आली आहे. कसाई गल्ली येथील फिश मार्केट आणि कोनवाळ गल्लीतील मटण मार्केट, सरदार्स मैदानावरील क्रीडा संकुलातील व्यापारी गाळे, महात्मा फुले मार्केट, जुना धारवाड रोड स्क्रॅप मार्केट, अनगोळ नाका व माळमारुती डबल रोड, खंजर गल्लीतील क्यापारी गाळय़ांचा समावेश आहे. फिश मार्केटची इमारत नव्याने बांधण्यात आली असून येथील 20 गाळय़ांच्या भाडेकराराची मुदत संपुष्टात आल्याने लिलाव आयोजित करण्यात आला आहे. कसाई गल्लीमधील कत्तलखाना व बकऱयांचे शेड भाडय़ाने देण्यात येणार आहे. कोनवाळ गल्ली येथील कत्तलखाना व बकऱयांचे शेड भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे.
खंजर गल्ली परिसरातील लक्ष्मी मार्केटच्या जागेत दुचाकी व चार चाकी वाहन तळ उभारण्यात आला आहे. स्क्रॅप व्यावसायिकांसाठी गाळे उभारण्यात आले आहे. सदर गाळे बांधून चार वर्षे झाली, पण अद्याप वाहनतळ पार्किंगकरिता खुले करण्यात आले नाही. येथील गाळेदेखील भाडेतत्त्वावर देण्यात आले नाही. त्यामुळे वाहनतळ खुले करण्यासाठी पार्किंगशुल्क आकारणीच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. येथील 39 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला आहे.
सरदार्स मैदानावर गॅलरी व व्यापारी गाळे उभारण्यात आले आहेत. पण गाळे अद्याप भाडेतत्त्वावर देण्यात आले नाहीत. त्यामुळे येथील चार गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला आहे. अनगोळ नाका, माळमारुती डबल रोडशेजारील गाळे आणि जुना धारवाड रोड येथील स्क्रॅप मार्केटमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. दि. 9 ऑक्टोबरपासून लिलाव प्रक्रियेला प्रारंभ होणार असून सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत महापालिकेच्या मुख्य कार्यालयात प्रक्रिया चालणार आहे. लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी पन्नास हजार रुपये अनामत रक्कम जमा करणे बंधनकारक आहे.









