केदनूर येथील शेतकऱयाचे 25 हजाराचे नुकसान
वार्ताहर/ कडोली
केदनूर येथील शिवारात वीज खांबांवरील लोंबकळणाऱया वीजतारांचा स्पर्श होऊन कडबा भरलेल्या ट्रॉलीला आग लागून एका शेतकऱयाचे सुमारे 25 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
अधिक माहिती अशी की, केदनूर येथील शेतकरी सन्नाप्पा कल्लाप्पा बुरली हा सकाळी आपल्या शिवारातून कडबा भरून ट्रॉली आणत असताना वीज खांबांवरील तारेचा स्पर्श कडाब्याला झाला आणि आग लागली. तात्काळ तेथील शेतकऱयांनी वेळ न घालवता ट्रॉली खाली केली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. परंतु या आगीत संपूर्ण ट्रॉलीभर कडबा जळून खाक झाला. त्यामुळे या शेतकऱयाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी तलाठय़ाने भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
लोंबकळणाऱया तारा शेतकऱयांच्या जीवावर बेतल्या
केदनूर, मण्णीकेरी, कडोली, जाफरवाडी परिसरातील शिवारातून अनेक ठिकाणी वीज खांबांवरील तारा लोंबकळत आहेत. काही ठिकाणी आठ-दहा फुटांवर तारा लेंबकळत आहेत. त्यामुळे शेतकऱयांना कडबा, गवत आणणेही अवघड बनत आहे. लोंबकळणाऱया तारा आता शेतकऱयांच्या जीवावर बेतल्या आहेत. तरी हेस्कॉमचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.









