वार्ताहर/ अथणी
रात्रीच्यावेळी हवेत उष्मा वाढल्याने सध्या अनेक नागरिक घराच्या छतावर झोपण्यासाठी जात आहेत. याचाच गैरफायदा घेत शुक्रवारी रात्री चोरटय़ांनी तेलसंग (ता. अथणी) येथे एकाच रात्री दहा घरांमध्ये चोरी केली. चोरटय़ांनी यापैकी 6 घरातील 7 तोळे सोने, 1 किलो चांदी व रोख 7.25 लाख रुपये लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्याने चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुदेव जमखंडी, हणमंत जमखंडी, बशीर अपराज, अकबर करजी यांच्या घरात तसेच विठ्ठल मंदिर मध्ये चोरी करीत चोरटय़ांनी एकूण 7 तोळे सोन्याचे दागिने, 1 किलो चांदी, रोख 7.25 लाख असा सुमारे 10 लाखांचा ऐवज घेवून पोबारा केला. तसेच आणखी 4 घरेदेखील फोडण्यात आली असून चोरटय़ांना तिथे मात्र काहीच हाती लागलेले नाही. एकाच रात्री चोरटय़ांनी इतक्या ठिकाणी चोरी केल्याने एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच सीपीआय शंकरगौडा बसगौडर यांनी आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळी भेट दिली. सदर चोरटे हे गावात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, पोलिसांनी त्याचा आधार घेत पुढील तपास सुरु केला आहे.









