पालकमंत्र्यांची स्पष्टोक्ती :
अंतिम परवानगी मिळाल्यानंतरच प्रवासी वाहतूक सुरू
प्रकल्पाबाबत घेतला आढावा
प्रतिनिधी / परुळे:
अंतिम परवानगी मिळाल्यानंतरच आठ ते दहा दिवसांत चिपी-परुळे विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू होईल. अद्याप विमानतळाच्या उद्घाटन सोहळय़ाची तारीख निश्चित झालेली नाही. आठ ते दहा दिवसानंतर प्रवासी वाहतूक सुरू होईल. काही तारखा जाहीर होत आहेत. त्यात काही तथ्य नाही. अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, अशी स्पष्टोक्ती पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी चिपी विमानतळ पाहणी दरम्यान केली.
पालकमंत्री सामंत यांनी विमानतळ प्रकल्पाबाबत अधिकाऱयांसमवेत आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, विधानसभा मतदारसंघ
संपर्कप्रमुख शैलेश परब, रुची राऊत, विकास कुडाळकर, अतुल बंगे, आयआरबी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी जयंत डांगरे, किरण कुमार, प्रकल्प अधिकारी राजेश लोणकर, चिपी सरपंच गणेश तारी, सचिन देसाई, मनोहर येरम आदी उपस्थित होते.
चिपी विमानतळावर पहिल्यांदाच दाखल झालेले पालकमंत्री सामंत यांनी आज दुपारी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीची पाहणी केली. त्यानंतर विमानतळाच्या कामाबाबत आढावा घेतला. या दरम्यानच दिल्ली येथून विमानतळाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या टिमला या पाहणी दौऱयात काही त्रुटी आढळल्या आहेत. त्या दूर करून आठ ते दहा दिवसानंतर प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबत पालकमंत्र्यांनी सूतोवाच केले आहे.
आज सकाळपासून सोशल मीडियावर एमआयडीसी आणि आयआरबी कंपनीचा लोगो असलेल्या निमंत्रण पत्रिकेवर विमानतळाचे उद्घाटन 23 जानेवारी रोजी होणार, असा मेसेज फिरत होता. त्यात कोणतीही तथ्य नसल्याचे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले. याबाबत मंत्रालय किंवा संबंधित कंपनीकडून हे पत्रक काढले नसल्याचे त्यांनी सांगितले. अद्याप विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित करणे बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विमानतळाला पाणीपुरवठा करणाऱया विहिरीची पाहणी
चिपी विमानतळ येथील पाहणी दौरा संपल्यानंतर विमानतळाला पाणीपुरवठा करणाऱया परुळे येथील विहिरीची पाहणी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत केली. यावेळी दीपक केसरकर, विनायक राऊत, वैभव नाईक उपस्थित होते. चिपी विमानतळाच्या मुहूर्ताची तारीख अद्याप ठरलेली नाही, तरीही 30 जानेवारीपूर्वी विमानसेवा सुरू होणार.
निमंत्रण पत्रिकेबाबत अनभिज्ञ-पालकमंत्री
सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झालेली निमंत्रण पत्रिका नेमकी कोणाकडून आली, याबाबत आपल्यालाच कल्पना नाही. तारीख अजून ठरायची आहे. आपण व खासदार ही निमंत्रण पत्रिका आणि तारखेबद्दल अनभिज्ञ आहोत, असे पालकमंत्री म्हणाले.
निमंत्रण पत्रिका व्हायरल
सोशल मीडियावर विमानतळाचे उद्घाटन 23 जानेवारी रोजी, अशी संबंधित ठेकेदार कंपनीचा लोगो असलेली निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली आहे. या विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
विमानतळाचे भवितव्य डिजीसीएच्या हाती
दिल्ली येथील डिजीसीएची टीम विमानतळाची पाहणी करून रविवारी सकाळी दिल्लीला रवाना झाली असून सोमवारी सायंकाळपर्यंत त्यांचा अहवाल येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच विमानतळाच्या उद्घाटनाबाबत अंतिम निर्णय होणार आहे. विमानतळाचे भवितव्य आता दिल्ली येथील डिजीसीएच्या हाती आहे.
सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून उदयास येईल-राऊत
देशातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून हा विमानतळ उदयास येईल. केंद्रीय हवाई मंत्री हार्दिक सिंग पुरी यांचे या विमानतळाबाबत पूर्णपणे सहकार्य असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पुरी यांच्यामध्ये सतत संवाद सुरू आहे. तसेच केंद्र सरकार या प्रकल्पाला अनुकूल असून त्यांचेही सहकार्य मिळत आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध असून वेंगुर्ले येथून येणारा रस्ता आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाला आहे, तर पाट-पिंगुळी रस्ताही आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाने काम सुरू आहे. लवकरच हा विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी सुरू होईल, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
विमानतळाला ‘मुहूर्त’ मिळेना
आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री सामंत यांनी आपल्यासह खासदारांना निमंत्रण पत्रिकेबाबत काहीच माहिती नाही, असे सांगितले. मात्र, या विमानतळाला मुहूर्त मिळेना, असे झाले आहे. प्रथम सत्ताधारी पक्षाकडून 26 जानेवारीपूर्वी उद्घाटन करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आज व्हायरल झालेल्या निमंत्रण पत्रिकेत 23 जानेवारी रोजी विमानतळाचे उद्घाटन होईल, असे म्हटले होते. मात्र, ‘तारीख पे तारीख’मुळे नेतेमंडळी सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळत आहेत का?, असा सवाल उपस्थित होत आहे.









