खासदार विनायक राऊत यांचे प्रतिपादन
बॅ. नाथ पै यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
संसदीय लोकशाहीला एका वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवणारे संसदपटू बॅ. नाथ पै यांचे नाव चिपी विमानतळास देण्यासाठी आम्ही आग्रही राहू, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.
राजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार, संसदपटू बॅ. नाथ पै यांच्या 50 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित ‘बॅ. नाथ पै’ या पुस्तकाचे
प्रकाशन बॅ. नाथ पै यांचे शालेय शिक्षण झालेल्या वेंगुर्ले शाळा नं. 1 येथे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी खासदार राऊत बोलत होते.
यावेळी लेखिका तथा नाथ पै यांची नात अदिती पै, माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, संपर्कप्रमुख शैलेश परब, रुची राऊत, उमेश गाळवणकर, दीपक नाईक, शिवसेनेचे युवानेते संदेश पारकर, अतुल बंगे, बॅ. नाथ पै यांचे सहकारी बाबुकाका अवसरे, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, अमरसेन सावंत,
जयप्रकाश चमणकर, कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर, ऍड. देवदत्त परुळेकर, कमलताई परुळेकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, वेंगुर्ले उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ, मंजुश्री आरोलकर उपस्थित होते.
राऊत म्हणाले, बॅ. नाथ पै यांच्या 50 व्या स्मृतिदिनी त्यांची नात अदिती पै यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. नाथ पै यांनी संसदीय लोकशाहीला फार मोठय़ा उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाशी आम्ही स्पर्धा करू शकत नाही. कोकण रेल्वेच्या निर्धाराला गती देण्याचे काम त्यांनी मांडलेल्या कट मोशनने केले.
नाथ पै यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारणार- सामंत
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, बॅ. नाथ पै हे राजापूर मतदारसंघाचेच नव्हे, तर हिंदुस्थानचा अनमोल ठेवा होते. त्यामुळे शासकीय ग्रंथालयात नाथ पै यांचे पुस्तक सक्तीने ठेवले जाण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महाराष्ट्रातील 12 हजार 500 ग्रंथालयांमध्ये हे पुस्तक असेल. जे युवा पिढीला प्रेरणादायी ठरेल. ज्या वेंगुर्ले तालुक्यात बॅ. नाथ पै यांचे प्राथमिक शिक्षण झाले, तेथे त्यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे. ज्यात व्यायामशाळा, जीम, महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रशस्त हॉल आदी सुविधा असतील. त्यासाठी 50 लाख रुपये मंजूर करण्यात येतील. या सांस्कृतिक केंद्राला पर्यटकही भेट देतील.
…तर ती त्यांना खरी आदरांजली- दीपक केसरकर
आमदार दीपक केसरकर म्हणाले, बॅ. नाथ पै यांनी राजापूर मतदारसंघाप्रमाणेच बेळगाव व सीमाप्रश्नावर फार मोठे काम केले. सीमाप्रश्नावर भाषण करत असतानाच त्यांचे निधन झाले. आज सीमाप्रश्न सुप्रिम कोर्टात आहे. सुप्रिम कोर्टाचे सरन्यायाधीश हे मराठी आहेत. बॅ. नाथ पै यांच्या 50 व्या स्मृतिदिन वर्षात सीमाप्रश्न सुटल्यास तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
दरम्यान, नाथ पै यांचे प्राथमिक शिक्षण झालेल्या वेंगुर्ले केंद्रशाळा नं. 1 मध्ये त्यांचे स्मारक होण्यासाठी या शाळेला केसरकर यांनी दहा लाखाची देणगी जाहीर केली.
सर्वांच्या सहकार्यामुळे लिखाण -अदिती पै
आपल्या आजी-आजोबांकडून सांगण्यात येणाऱया गोष्टीत सतत नाथ पै व वेंगुर्ल्याचा विषय यायचा. त्यामुळे आपली वेंगुर्ल्याविषयी तसेच आजोबा नाथ पै यांच्याविषयीची उत्सुकता वाढली. त्यातूनच माहिती गोळा करून त्यावर पुस्तक लिहिण्याची इच्छा निर्माण झाली. येथील समाजवादी विचारसरणीचे नेते पुष्पसेन सावंत, आना महाले, बाबुकाका अवसरे आदींकडून माहिती घेऊन आपण हे पुस्तक लिखाण केल्याचे अदिती पै यांनी सांगितले.
यावेळी नाथ पै यांच्या प्रतिमेला पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. शैलेंद्र पै आणि अदिती पै यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी अदिती पै व शैलेंद्र पै यांचा सत्कार पालकमंत्री सामंत व खासदार राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. तर अदिती पै व शैलेंद्र पै यांच्या हस्ते उदय सामंत, विनायक राऊत, दीपक केसरकर, कमलताई परुळेकर, अवसरे, ऍड. देवदत्त परुळेकर यांचा सत्कार करण्यात आला. बॅ. नाथ पै, मधु दंडवते यांचा वारसा पुढे नेणारे खासदार विनायक राऊत यांचा सत्कार नाथ पै यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला.
बॅ. नाथ पै यांच्या कपात सूचनेमुळे आज कोकण रेल्वे दिसतेय, असे कमलताई परुळेकर म्हणाल्या. संपूर्ण देशाला नाथ पै कळण्यासाठी शालेय पुस्तकात बॅ. नाथ पै यांचा धडा ठेवावा, असे उमेश गाळवणकर यांनी सूचित केले. यावेळी प्रवीण बांदेकर, सुनील डुबळे, सचिन वालावलकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन सचिन वालावलकर यांनी केले, तर आभार देवदत्त परुळेकर यांनी मानले.









